
- आगरी समाज भवनासाठी आर्थिक योगदान
रायगड, 09 जुलै (हिं.स.)। सेझविरोधी लढ्यात महत्त्वाची भूमिका बजावलेल्या २२ गाव बचाव संघर्ष समिती, खारेपाट विभाग यांच्या वतीने समाजोपयोगी कार्याला प्राधान्य देत आगरी समाज संस्था, अलिबाग यांना वाडगाव येथे उभारण्यात येणाऱ्या आगरी समाज भवनासाठी ५१ हजार रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला. हा धनादेश समारंभपूर्वक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी भुवनेश्वर मंदिर ट्रस्टचे सचिव नरेंद्र पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघर्ष समितीचे अध्यक्ष अर्जुन गावंड गुरुजी होते. त्यांनी समितीच्या स्थापनेपासूनच्या कार्याचा आढावा घेत सेझ प्रकल्पाला विरोध करण्यासाठी स्थापन झालेल्या समितीने आपले उद्दिष्ट यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर शिल्लक निधी समाजोपयोगी कार्यासाठी वापरण्याचा निर्णय घेतल्याची माहिती दिली.
यावेळी खारेपाट विभागातील चार नोंदणीकृत व कार्यक्षम संस्थांना आर्थिक मदत देण्यात आली. भुवनेश्वर मंदिर ट्रस्टला पाणी व्यवस्थापनासाठी, आगरी समाज संस्थेला समाज भवन उभारणीसाठी, तसेच ज्येष्ठ नागरिक संघ हाशिवरे आणि ज्येष्ठ नागरिक संघ कामार्ले यांना धनादेश प्रदान करण्यात आले. याच कार्यक्रमात समितीचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याने २२ गाव बचाव संघर्ष समिती विसर्जित करण्याचा निर्णयही जाहीर करण्यात आला.
आगरी समाज संस्थेचे अध्यक्ष निलेश पाटील यांनी संघर्ष समितीचे आभार मानत आगरी समाज भवन हे समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक विकासाचे केंद्र ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. कार्यक्रमाला अनंत म्हात्रे, राजेंद्र पाटील, उदय म्हात्रे, मिलिंद धोदरे, मनोहर पाटील, डॉ. जगन्नाथ पाटील, प्रल्हाद पाटील तसेच खारेपाट विभागातील २२ गावांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)