
छत्रपती संभाजीनगर, 9 जुलै (हिं.स.) : सिल्लोड–सोयगाव विधानसभा मतदारसंघातील स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन (SIR) अर्थात विशेष सघन मतदार यादी पुनरिक्षण मोहिमेच्या अनुषंगाने भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली.
बैठकीत मतदार नोंदणी प्रक्रियेत पारदर्शकता, अचूकता आणि नियमबद्धता राखण्यावर भर देण्यात आला. प्रत्येक पात्र नागरिकाची मतदार म्हणून योग्य पद्धतीने नोंदणी सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच बूथस्तरावरील नियोजन, कार्यपद्धती आणि आगामी कामकाजाबाबत पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
या बैठकीस महाराष्ट्र प्रदेश भाजपचे सरचिटणीस तथा माजी आमदार सुनील राणे, माजी आमदार सांडू पाटील लोखंडे, एसआयआर प्रमुख सुरेश बनकर यांच्यासह ज्ञानेश्वर मोठे, दिलीप दाणेकर, उत्तम चव्हाण, सुनील मिरकर, अशोक गरुड, राधाकृष्ण काकडे, मकरंद कोरडे, भगवान आहेर, ज्ञानेश्वर तायडे, कमलेश कटारिया तसेच सिल्लोड व सोयगाव विधानसभा मतदारसंघातील मंडळाध्यक्ष, तालुकाध्यक्ष आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी सशक्त लोकशाहीसाठी अचूक, अद्ययावत आणि पारदर्शक मतदार यादी तयार करणे हे सर्वांचे सामूहिक ध्येय असल्याचा संदेश बैठकीत देण्यात आला.
------------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis