
अमरावती, 09 जुलै (हिं.स.) - परतवाडा शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीसमोरील कृषी विभागाच्या मोकळ्या जागेत साचणाऱ्या घाण पाण्यामुळे बालाजीनगर आणि प्राध्यापक कॉलनी परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आली नसल्याचा आरोप रहिवाशांनी केला असून, प्रशासनाने तातडीने ही समस्या सोडवावी, अशी मागणी होत आहे.
कृषी विभागाच्या कार्यालयालगत असलेल्या मोकळ्या जागेत शहरातील सांडपाणी व पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचत आहे. त्यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरत असून डास व मच्छरांचा प्रादुर्भाव वाढला आहे. परिणामी डेंगी, मलेरिया यांसारख्या साथीच्या आजारांचा धोका निर्माण झाल्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.
बालाजीनगर व प्राध्यापक कॉलनी परिसरातील नागरिकांसाठी हा मुख्य रहदारीचा मार्ग असल्याने दररोज दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. संबंधित विभागाकडे अनेकदा तक्रारी करूनही प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित असल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. उपविभागीय कृषी अधिकारी प्रफुल्ल सातव यांनी नागरिकांच्या निवेदनानंतर नगरपालिकेशी पत्रव्यवहार करण्यात आल्याची माहिती दिली. मागील वर्षीही याबाबत पत्र देण्यात आले होते, मात्र अद्याप प्रश्न सुटलेला नसल्याचे त्यांनी सांगितले.
----------------------------------------------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी