ज्ञानोबा-तुकाराम'च्या जयघोषाने पुणे दुमदुमले; हजारो वारकऱ्यांचे उत्साहात स्वागत
पुणे, 09 जुलै (हिं.स.)। आषाढी वारीनिमित्त देहूहून पंढरपूरकडे प्रस्थान केलेल्या जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे गुरुवारी पुण्यात भक्तिमय वातावरणात आगमन झाले. पालखीच्या स्वागतासाठी पुणेकरांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत फुलांची उ
Ng


पुणे, 09 जुलै (हिं.स.)।

आषाढी वारीनिमित्त देहूहून पंढरपूरकडे प्रस्थान केलेल्या जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे गुरुवारी पुण्यात भक्तिमय वातावरणात आगमन झाले. पालखीच्या स्वागतासाठी पुणेकरांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत फुलांची उधळण, टाळ-मृदुंगाचा गजर आणि हरिनामाच्या घोषात संत तुकाराम महाराजांना अभिवादन केले.

पालखीसोबत हजारो वारकरी पारंपरिक वेशात, हातात टाळ, वीणा आणि भगवी पताका घेऊन अभंग गात मार्गक्रमण करत होते. ज्ञानोबा-तुकाराम, पुंडलिक वरदा हरी विठ्ठल अशा जयघोषांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. पुणे शहरात पालखीच्या आगमनाने सर्वत्र भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले.

पालखी मार्गावर विविध सामाजिक संस्था, मंडळे, स्वयंसेवी संघटना तसेच नागरिकांनी वारकऱ्यांसाठी पिण्याचे पाणी, अल्पोपहार, वैद्यकीय सेवा आणि इतर आवश्यक सुविधांची व्यवस्था केली होती. अनेक ठिकाणी आकर्षक रांगोळ्या, फुलांची सजावट आणि स्वागत कमानी उभारून पालखीचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.

पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. वाहतुकीचे नियोजन, गर्दी नियंत्रण तसेच आपत्कालीन सेवांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. नागरिकांनीही प्रशासनाच्या सूचनांचे पालन करत पालखी सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

आषाढी एकादशीनिमित्त श्रीक्षेत्र पंढरपूरकडे निघालेल्या संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचा पुढील प्रवास नियोजित वेळापत्रकानुसार सुरू राहणार असून, लाखो वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी पायी वारी करत पंढरपूरकडे मार्गक्रमण करीत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande