
रायगड, 09 जुलै (हिं.स.)। टीईटी परीक्षेमुळे निर्माण झालेली सेवा विषयक अस्थिरता, पदोन्नती प्रक्रिया, संचमान्यता धोरण तसेच शासनाच्या कथित दुर्लक्षाच्या निषेधार्थ राज्यभरातील शिक्षकांनी गुरुवारी (दि. ९) सामूहिक रजा आंदोलन पुकारत मुंबईत शक्तीप्रदर्शन केले. या आंदोलनाचा मोठा परिणाम रायगड जिल्ह्यातील शाळांवर झाला असून, जिल्ह्यातील सुमारे ८० टक्के शिक्षक आंदोलनात सहभागी झाल्याने अनेक शाळांमधील नियमित अध्यापन पूर्णपणे विस्कळीत झाले. त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दिवस वाया गेला.
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे राज्याध्यक्ष राजेश सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात राज्यातील विविध शिक्षक संघटनांनी सहभाग घेतला. रायगड, ठाणे, पालघर, मुंबई, नवी मुंबई आणि महानगरपालिका क्षेत्रातील सहा हजारांहून अधिक शिक्षक मुंबईतील आंदोलनात सहभागी झाले.
रायगड जिल्ह्यातील सुमारे ५ हजार ६०० शिक्षकांपैकी चार हजारांहून अधिक शिक्षकांनी सामूहिक रजा घेतल्याने अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षकांविनाच वर्गात बसावे लागले. काही ठिकाणी शिक्षणसेवक आणि उपलब्ध शिक्षकांच्या मदतीने शाळा सुरू ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र शिक्षकांच्या मोठ्या प्रमाणातील अनुपस्थितीमुळे नियमित अध्यापन होऊ शकले नाही.
आंदोलनकर्त्यांनी विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख आणि मुख्याध्यापक पदोन्नती प्रक्रिया स्थगित करणे, टीईटी नियमांमध्ये शिथिलता देणे, संचमान्यता धोरण रद्द करणे तसेच बीएलओसह सर्व अशैक्षणिक कामांतून प्राथमिक शिक्षकांची मुक्तता करण्याची मागणी केली.
आंदोलनानंतर शिक्षणमंत्र्यांसोबत सकारात्मक चर्चा झाली असून, लवकरच सचिवस्तरीय बैठक होणार असल्याची माहिती शिक्षक परिषदेने दिली. दरम्यान, शिक्षकांच्या आंदोलनाचा थेट फटका मात्र विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला बसल्याचे चित्र रायगड जिल्ह्यात पाहायला मिळाले.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)