
रत्नागिरी, 9 जुलै (हिं.स.) । रत्नागिरी जिल्हा प्राथमिक शिक्षक समन्वय समितीने आज (९ जुलै) रत्नागिरीत जिल्हा परिषदेच्या शाळा बंद ठेवून आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी मोर्चा काढून धरणे आंदोलन केले.
टीईटी परीक्षा रद्द करून सेवा संरक्षण द्यावे, बीएलओ ड्युटी आणि अशैक्षणिक कामे रद्द करावीत, शिक्षकांना फक्त शिकवण्याचे काम द्यावे, रिक्त पदे तातडीने भरावीत, जुनी पेन्शन योजना लागू करावी, शिक्षण सेवक कालावधी रद्द करावा, पदोन्नतीविषयीच्या अन्यायकारक अटी रद्द कराव्यात आणि संचमान्यतेचे चुकीचे धोरण रद्द करावे, अशा विविध मागण्या शिक्षकांनी केल्या आहेत.
दुपारी १२ वाजता माळ नाका येथून सुरू झालेला मोर्चा जिल्हा परिषद कार्यालयावर नेण्यात आला. तेथे धरणे धरून सहभागी शिक्षकांनी घोषणा देऊन निदर्शने केली. जिल्ह्यातील १६ प्रमुख संघटनांनी या आंदोलनात सहभाग घेतला होता. यानंतर शिष्टमंडळाने जिल्हा प्रशासनाकडे आपल्या मागण्याचे निवेदन सादर केले. योग्य दखल घेतली न गेल्यास संपूर्ण राज्यात हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही या वेळी देण्यात आला.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी