
अमरावती, 09 जुलै (हिं.स.) अमरावतीकरांसाठी पुन्हा एकदा पाणीपुरवठ्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. अमरावती आणि बडनेरा शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी नांदगाव पेठ परिसरात पुन्हा आज सकाळी फुटली. या दुर्घटनेमुळे लाखो लिटर पाणी वाया जाते आहे. पाईपलाईन फुटल्याने शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता आहे. संबंधित यंत्रणेकडून दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आल्याची माहिती आहे.
दुरुस्ती पूर्ण होईपर्यंत अमरावती आणि बडनेरा शहरातील पाणीपुरवठा बंद राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी