
अमरावती, 09 जुलै (हिं.स.) शहर गुन्हे शाखेने एका धाडसी कारवाईत नांदगाव पेठ परिसराच्या हद्दीतील वाळकी डॅम परिसरातून एमडी व गांजासह एकुण ३ लाख ६३ हजार ४७० रुपयांच्या मुद्देमालासह तीन तस्करांना रंगेहात अटक केली आहे. या कारवाईमुळे शहरातील ड्रग्ज तस्करांचे धाबे दणाणले आहेत. ९ जुलै रोजी दुपारी दोन वाजताच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. सैफ अली आसिफ अली (वय ३२, रा. फरीद नगर), आवेजउद्दीन नासीरउद्दीन (वय २०, रा. हैदरपुरा) आणि मोहम्मद तौसीफ मोहम्मद जफर (वय २४, रा. गौस नगर) अशी अटक आरोपींची नावे आहेत.
वाळकी डॅम्पकडे जाणाऱ्या रोडने काही इसम एमडी ‘मॅफेड्रॉन’ पावडर विकण्याच्या उद्देशाने येणार आहेत, अशी माहिती गुन्हे शाखाप्रमुख अतुल वर यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी ९ जुलै रोजी दुपारी दोन वाजताच्या सुमारास वाळकी डॅम रोडवर सापळा रचला. या कारवाईदरम्यान तीन आरोपींना ताब्यात घेतले. अटक करण्यात तिघांकडे ३ लाख रुपये किमतीचे २२.०७ ग्रॅम एम.डी. पावडर, २२ हजार २७० रुपये किमतीचा १ किलो १२४ ग्रॅम गांजा, ४० हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल फोन असा एकूण ३ लाख ६३ हजार ४७० रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. पोलिसांनी हा सर्व मुद्देमाल जप्त केला असून आरोपींविरुद्ध नांदगाव पेठ पोलीस ठाण्यात एनडीपीएस ॲक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे.
नागपुरातून आणले एमडी
प्राथमिक चौकशीत हा अंमली पदार्थ आपण नागपूरच्या इरशाद खान ऊर्फ अरशद याच्याकडून आणल्याची कबुली सैफ अली याने दिली. वाळकी डॅम परिसर हा निर्मनुष्य असतो. तेथे केवळ प्रेमीयुगुलांची येजा असते. त्यामुळे आरोपी तेथे कुणाला एमडी देणार होते, कुणाला गांजाची पुडी देणार होते, याबाबत गुन्हे शाखेने तपास चालविला आहे. पोलिस आयुक्त राकेश ओला यांच्या आदेशानुसार गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल वर यांच्या नेतृत्वातील एपीआय महेश इंगोले व पीएसआय गजानन सोनुने यांच्या पथकाने ही कारवाई केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी