
लातूर, 09 जुलै (हिं.स.)।
लातूर येथील मध्यवर्ती बसस्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळ गुरुवारी सकाळी झालेल्या दुर्दैवी अपघातात ८० वर्षीय मुरलीधर मुंदडा यांचा एसटी बसच्या चाकाखाली येऊन मृत्यू झाला. या घटनेमुळे बसस्थानक परिसरात एकच खळबळ उडाली आणि प्रवाशांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
प्राथमिक माहितीनुसार, मुरलीधर मुंदडा हे बसस्थानक परिसरातून जात असताना एका एसटी बसच्या चाकाखाली आले. या भीषण अपघातात ते गंभीर जखमी झाले. त्यांना शासकीय रुग्णालयात नेले असता त्यांचा मृत्यू झाल्याचेसांगितले. घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला.
या अपघातानंतर काही काळ बसस्थानक परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत वाहतूक सुरळीत केली. अपघात नेमका कसा घडला, याचा तपास पोलीस करत आहेत.
बसस्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात प्रवाशांची वर्दळ असते. त्यामुळे अशा दुर्घटना टाळण्यासाठी वाहतूक नियोजन, वेगावर नियंत्रण आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis