
नांदेड, 9 जुलै (हिं.स.) : नांदेड येथे स्वतंत्र महसूल आयुक्तालयाची स्थापना आणि नांदेड–मुंबई दररोज नियमित विमानसेवा सुरू करण्याच्या दोन प्रमुख मागण्यांसाठी आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली नांदेड जिल्ह्यातील विविध मतदारसंघांच्या सर्वपक्षीय आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संयुक्त निवेदन सादर केले.
निवेदनात छत्रपती संभाजीनगर महसुली विभागाचे विभाजन करून नांदेड, परभणी, हिंगोली आणि लातूर या चार जिल्ह्यांसाठी नांदेड येथे स्वतंत्र महसूल आयुक्तालय स्थापन करण्याची मागणी करण्यात आली आहे. वाढती लोकसंख्या आणि प्रशासकीय कामकाजावरील वाढता ताण लक्षात घेता मराठवाड्यात दुसरे महसूल आयुक्तालय सुरू करणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
तसेच नांदेड–मुंबई विमानसेवा दररोज सुरू करण्याची मागणीही करण्यात आली. नवी मुंबई विमानतळ कार्यान्वित झाल्यानंतर मुंबई विमानतळावर स्लॉट उपलब्ध होण्याची शक्यता असल्याने सकाळी नांदेडहून मुंबईकडे आणि रात्री मुंबईहून नांदेडकडे नियमित विमानसेवा सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या निर्णयामुळे नांदेडसह लातूर, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांतील नागरिक, व्यापारी आणि विद्यार्थ्यांना मोठा लाभ होईल, असे निवेदनात म्हटले आहे.
यावेळी हेमंत पाटील, भीमराव केराम, राजेश पवार, तुषार राठोड, बालाजीराव कल्याणकर, बाबुराव कदम कोहळीकर, जितेश अंतारपुरकर आणि आनंदराव बोंढारकर यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
------------------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis