
सोलापूर, 09 जुलै (हिं.स.)पुणे जिल्ह्याच्या पश्चिम घाटमाथ्यावर झालेल्या दमदार पावसामुळे सोलापूर जिल्ह्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या उजनी धरणातील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. सलग चार दिवसांच्या पावसामुळे धरणाने 'मायनस' साठ्यातून बाहेर पडत उपयुक्त (प्लस) साठ्यात प्रवेश केला.
बुधवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत उजनी धरणात ३१.८९ टक्के पाणीसाठा नोंदविण्यात आला. गेल्या ४८ तासांत तब्बल २३.६१ टीएमसी पाण्याची आवक धरणात झाली असून त्यामुळे जिल्ह्यातील पाणीटंचाईच्या चिंतेत मोठी घट झाली आहे.
यापूर्वी धरणातील पाणीसाठा उणे २७.२३ टक्क्यांपर्यंत घसरल्याने परिस्थिती गंभीर बनली होती. मात्र, घाटमाथ्यावर झालेल्या जोरदार पावसामुळे अवघ्या चार दिवसांत धरण 'मायनस'मधून 'प्लस' साठ्यात आले आहे.
दरम्यान, भीमा नदीपात्रातून उजनीकडे येणाऱ्या पाण्याच्या विसर्गातही चढ-उतार पाहायला मिळत आहेत. काही दिवसांपूर्वी १ लाख ६५ हजार क्युसेक इतका पोहोचलेला विसर्ग पावसाचा जोर कमी झाल्याने प्रथम १ लाख ५६ हजार क्युसेक आणि बुधवारी सायंकाळी ९२ हजार ८९२ क्युसेक इतका खाली आला. मात्र, रात्री पुन्हा पावसाचा प्रभाव वाढल्याने विसर्गात वाढ होऊन तो सव्वा लाख क्युसेकांच्या पुढे गेला.
घाटमाथ्यावर सुरू असलेल्या पावसामुळे आगामी काही दिवसांत उजनी धरणातील जलसाठ्यात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील पिण्याचे पाणी, शेती आणि सिंचनाच्या दृष्टीने ही अत्यंत दिलासादायक बाब मानली जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड