
- व्हीआयसह एअरटेल-जिओ सेवाही वारंवार ठप्प
रायगड, 9 जुलै (हिं.स.) : रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन शहर आणि तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून मोबाईल नेटवर्कची समस्या गंभीर बनली असून नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. सलग तीन दिवस Vi (व्होडाफोन आयडिया) चे नेटवर्क अनेक भागांत पूर्णपणे ठप्प राहिल्यानंतर आता एअरटेल आणि जिओच्या सेवाही वारंवार खंडित होत असल्याने नागरिक, व्यापारी, विद्यार्थी आणि पर्यटकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
मोबाईल नेटवर्क अचानक गायब होत असल्याने फोन कॉल लागत नसून इंटरनेट सेवाही वारंवार बंद पडत आहेत. परिणामी यूपीआय व्यवहार, नेट बँकिंग, ऑनलाइन शासकीय सेवा, शैक्षणिक उपक्रम तसेच दैनंदिन व्यावसायिक कामकाजावर मोठा परिणाम होत आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन परिस्थितीत संपर्क साधणे कठीण झाल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे.
नेटवर्क समस्येचा सर्वाधिक फटका स्थानिक व्यापाऱ्यांना बसत आहे. यूपीआय आणि क्यूआर कोडद्वारे होणारे व्यवहार अडकत असल्याने अनेक ग्राहकांना रोख रकमेअभावी खरेदी करता येत नाही. परिणामी व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असून स्थानिक बाजारपेठेतील व्यवहारांवरही त्याचा विपरीत परिणाम दिसून येत आहे.
या सततच्या समस्येमुळे मोबाईल सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांविरोधात नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. रिचार्जचे दर सातत्याने वाढत आहेत; मात्र सेवेचा दर्जा दिवसेंदिवस खालावत आहे. तीन दिवस Vi चे नेटवर्क बंद होते आणि आता एअरटेल व जिओच्या सेवाही वारंवार ठप्प होत आहेत. संबंधित कंपन्यांनी तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना करून अखंडित सेवा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी श्रीवर्धनचे नागरिक गणेश कुडगांवकर यांनी केली.
दरम्यान, पावसाळ्याच्या काळात मोबाईल नेटवर्कचा प्रश्न तातडीने सोडवून अखंडित सेवा उपलब्ध करून देण्याची मागणी श्रीवर्धन तालुक्यातील नागरिकांकडून जोर धरत आहे. दूरसंचार कंपन्यांनी तांत्रिक बिघाड दूर करून सेवा सुरळीत करण्याची अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.
---------------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)