
अमरावती, 09 जुलै (हिं.स.) मोर्शी पंचायत समितीत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी सत्यम गांधी यांनी आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी आरोग्य, पाणीपुरवठा, ग्रामविकास आदी कामांचा विस्तृत आढावा घेतला. यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना लोकाभिमुख व दर्जेदार कामकाजासाठी आवश्यक सूचना दिल्या. तत्पूर्वी सीईओंनी नेरपिंगळाई येथील प्राथमिक आरोग्यकेंद्रात पोहोचून तेथील स्वच्छतेची पाहणी केली. याशिवाय औषधसाठ्याची तपासणी आणि कर्मचारी उपस्थिती व कामकाजाचा आढावा घेतला.
प्राथमिक आरोग्यकेंद्राच्या इमारतीची प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या. यानंतर मोर्शी पंचायत समितीत घेतलेल्या बैठकीत आरोग्य, पाणीपुरवठा, ग्रामविकास व अन्य विभागांचा अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. यावेळी सीईओ सत्यम गांधी यांनी तालुक्यातील अंगणवाडी केंद्रे व शाळांमधील अत्यावश्यक सुविधा येणाऱ्या ग्रामविकास आराखड्यात प्राधान्याने समाविष्ट करणे, सोलर बॅटरी, पाणीपुरवठा व स्वच्छताविषयक कामे मोठ्या प्रमाणावर प्रस्तावित करून गावांच्या मूलभूत सुविधांना बळ द्यावे, असे निर्देश दिलेत. ज्या गावांमध्ये यापूर्वी मंजूर झालेली कामे जागेअभावी पूर्ण होऊ शकली नाहीत, त्या गावांना पुन्हा त्याच प्रकारची कामे प्रस्तावित करू नयेत, अशी सूचनासुद्धा त्यांनी केली. सर्व विभागांनी वेळेत, पारदर्शक व गुणवत्तापूर्ण अंमलबजावणीवर भर देत नागरिक केंद्रित कामकाज करावे, असे निर्देशही त्यांनी दिले. या बैठकीनंतर सीईओ सत्यम गांधी यांनी सिंभोरा येथील नल-दमयंती सागर धरणाला भेट देऊन धरणाची सद्यस्थिती, पाणीसाठा व संबंधित बाबींची माहिती घेतली.
-------------------------------------------------------------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी