‘MH-46 DK’ मालिकेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू
रायगड, 09 जुलै (हिं.स.)। प्रादेशिक परिवहन कार्यालय, पनवेल येथे दुचाकी वाहनांसाठी ‘MH-46 DK’ ही नवीन नोंदणी मालिका सुरू करण्यात येत आहे. आकर्षक किंवा पसंतीचा नोंदणी क्रमांक घेऊ इच्छिणाऱ्या वाहनधारकांनी 13 जुलै 2026 रोजी सकाळी 10 ते दुपारी 2.30 वाजे
Want a preferred vehicle number? Application process for the 'MH-46 DK' series has begun.


रायगड, 09 जुलै (हिं.स.)। प्रादेशिक परिवहन कार्यालय, पनवेल येथे दुचाकी वाहनांसाठी ‘MH-46 DK’ ही नवीन नोंदणी मालिका सुरू करण्यात येत आहे. आकर्षक किंवा पसंतीचा नोंदणी क्रमांक घेऊ इच्छिणाऱ्या वाहनधारकांनी 13 जुलै 2026 रोजी सकाळी 10 ते दुपारी 2.30 वाजेपर्यंत विहित नमुन्यात अर्ज सादर करावेत, असे आवाहन सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी केले आहे.

अर्जासोबत विहित शुल्काचा डिमांड ड्राफ्ट (DD), रहिवासी पत्त्याचा पुरावा, आधार कार्ड, पॅनकार्ड व अन्य आवश्यक कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती जोडणे बंधनकारक आहे. एखाद्या आकर्षक क्रमांकासाठी एकापेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाल्यास त्यांची यादी 13 जुलै रोजी सायंकाळी 4 वाजता कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात येईल.

अशा क्रमांकांसाठी इच्छुक अर्जदारांनी 14 जुलै रोजी दुपारी 3 वाजेपूर्वी वाढीव रकमेचा डिमांड ड्राफ्ट बंद लिफाफ्यात सादर करावा. त्यानंतर दुपारी 3.30 ते 4.30 या वेळेत सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या दालनात लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे. लिलावावेळी अर्जदार अनुपस्थित राहिल्यास संबंधित क्रमांक उपस्थित अर्जदारास देण्यात येईल.

आरटीओने जारी केलेल्या सूचनेनुसार डिमांड ड्राफ्ट राष्ट्रीयीकृत किंवा अनुसूचित बँकेचा असावा व तो दोन महिन्यांपेक्षा जुना नसावा. तसेच एकदा राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक बदलून मिळणार नाही. राखीव क्रमांक 180 दिवसांच्या आत वाहन नोंदणीसाठी वापरला नाही तर तो आपोआप रद्द होईल आणि भरलेली फी शासन जमा होईल. याबाबतची अधिक माहिती पनवेल आरटीओच्या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचे प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande