अमरावती - आठ दिवसांत वाढला धरणांतील जलसाठा
अमरावती, 09 जुलै (हिं.स.) जुलैतील पहिल्या सप्ताहातील दमदार पावसाने जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांतील जलसाठ्यात वाढ झाली आहे. मोठ्या धरणांसह मध्यम व लघू प्रकल्पातील जलसाठ्यात सरासरी पाच दलघमीची वाढ झाली असून मध्यम धरणांच्या श्रेणीतील पूर्णा मध्यम प्रकल
आठ दिवसांत वाढला धरणांतील जलसाठा


अमरावती, 09 जुलै (हिं.स.) जुलैतील पहिल्या सप्ताहातील दमदार पावसाने जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांतील जलसाठ्यात वाढ झाली आहे. मोठ्या धरणांसह मध्यम व लघू प्रकल्पातील जलसाठ्यात सरासरी पाच दलघमीची वाढ झाली असून मध्यम धरणांच्या श्रेणीतील पूर्णा मध्यम प्रकल्पातील जलसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी बुधवारी (ता. ८) विसर्ग सोडण्यात आला. जिल्ह्यात सद्यस्थितीत ४४.२५ टक्के जलसाठा झाला असून एक सप्ताहापूर्वी तो ३९.८९ टक्के होता.

यंदा तापमान ४६ अंशावर गेल्याने धरणांतील पाणीसाठ्यावरील ताण वाढून तो कमी झाला होता. मॉन्सूनला विलंब होऊ लागल्याने जलसाठ्याची चिंता वाढली होती. हवामान खात्याने पावसासंदर्भात दिलेल्या अंदाजावरून यंदा पर्जन्यमान कमी राहणार असल्याने ३१ ऑगस्टपर्यंत सिंचनासाठी आवर्तन देऊ नये, असे आदेश शासनाने जलसंपदा विभागास दिले होते. जून महिन्यात झालेल्या पावसातही सरासरीत तूट राहिल्याने या चिंतेत वाढ झाली होती. दरम्यान, आर्द्रा नक्षत्रात झालेल्या दमदार पावसाने व जुलैच्या पहिल्या सप्ताहातील सार्वत्रिक पावसाने जलसाठ्याची चिंता काही अंशी कमी केली. जिल्ह्यातील अप्पर वर्धा या मोठ्या धरणांसह सात मध्यम व ४८ लघू प्रकल्पांतील जलसाठ्यात वाढ झाली आहे. अप्पर वर्धामध्ये पाणीसाठी ५० टक्क्यांवर पोहोचला असून चंद्रभागा ७९ व पूर्णा ७१ टक्क्यांवर पोहोचला आहे. गर्गा वगळता इतर मध्यम प्रकल्पातील साठ्यातही वाढ नोंदविण्यात आली आहे. ३० जूनला जिल्ह्यात ३९.८९ टक्के साठा होता, त्यामध्ये वाढ होऊन सद्यस्थितीत तो ४४.२५ टक्क्यांवर पोहोचला आहे.

पूर्णा प्रकल्पातून विसर्ग चांदूरबाजार तालुक्यातील पूर्णा मध्यम प्रकल्पात बुधवारी (ता. ८) जलाशय पातळी वाढल्याने ती नियंत्रित राखण्यासाठी विसर्ग सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. आज बुधवारी सकाळी ७ च्या सुमारास या प्रकल्पांत २५.१८ दलघमी (७१ टक्के) साठा झाला होता. सध्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरूच आहे. धरणात पाण्याचा येवा वाढत असल्याने जलपातळी नियंत्रित करणे आवश्यक आहे. त्यासाठी बुधवारी सायंकाळी ४ वाजता दोन गेटमधून १५.५० घनमीटर प्रतिसेकंद विसर्ग सोडण्यात आला. यामुळे नदीला पूर येण्याची शक्यता असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला.

जिल्ह्यातील जलसाठा (दलघमी) प्रकल्प उपलब्ध साठा

अप्पर वर्धा २८६ ५० शहानूर १५.३२ ३३.२८ चंद्रभागा ३२.८२ ७९ पूर्णा २५.१८ ७१ सपन १५.६० ४० पंढरी १२.१२ २१.४९ बोर्डी नाला १.४२ ११.७२ ४८ लघू प्रकल्प ७४.३६ ३२.७८

-------------------------------------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande