कुरुंदा येथे गावठी रिव्हॉल्वर व खंजीरासह युवक अटकेत
छत्रपती संभाजीनगर, 9 जुलै (हिं.स.) : कुरुंदा पोलिसांनी पेट्रोलिंगदरम्यान केलेल्या धडक कारवाईत एका युवकाला अवैध गावठी रिव्हॉल्वर आणि धारदार लोखंडी खंजीरासह अटक केली. आरोपीकडून सुमारे 20 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्याच्याविरुद
अ


छत्रपती संभाजीनगर, 9 जुलै (हिं.स.) : कुरुंदा पोलिसांनी पेट्रोलिंगदरम्यान केलेल्या धडक कारवाईत एका युवकाला अवैध गावठी रिव्हॉल्वर आणि धारदार लोखंडी खंजीरासह अटक केली. आरोपीकडून सुमारे 20 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्याच्याविरुद्ध भारतीय हत्यार अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस ठाणे कुरुंदाचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव पुरी हे पथकासह हद्दीत गस्त घालत असताना गुप्त माहितीच्या आधारे वसमत–औंढा मार्गावरील कोर्टा पाटीजवळील एका हॉटेलमध्ये एक व्यक्ती गावठी रिव्हॉल्वर आणि धारदार खंजीर घेऊन बसल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत संशयिताला ताब्यात घेतले.

पंचांसमक्ष घेतलेल्या झडतीदरम्यान आरोपीच्या बॅगेतून एक गावठी रिव्हॉल्वर आणि एक धारदार लोखंडी खंजीर जप्त करण्यात आला. या शस्त्रांसह एकूण 20 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला.

याप्रकरणी कुरुंदा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 274/2026 नोंदविण्यात आला असून भारतीय हत्यार अधिनियमाच्या कलम 3/25 व 4/25 अन्वये आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गंधकवाड करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा, अप्पर पोलीस अधीक्षक कमलेश मीना आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव पुरी व त्यांच्या पथकाने केली.

----------------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande