
पुणे, 9 जुलै (हिं.स.) : खडकवासला धरणसाखळीत पावसाचा जोर काहीसा ओसरला असला तरी चारही धरणांमध्ये पाण्याची आवक कायम आहे. बुधवारी सकाळी सहा वाजेपर्यंत धरणसाखळीत एकूण 3.38 टीएमसी पाण्याची भर पडली असून, सध्या 16 टीएमसी (54.89 टक्के) उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध असल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली.
धरण परिसरात मंगळवारी अतिवृष्टीसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. त्या दिवशी खडकवासला येथे 101 मिमी, पानशेत येथे 171 मिमी, वरसगाव येथे 189 मिमी आणि टेमघर येथे 245 मिमी पावसाची नोंद झाली होती. मात्र बुधवारी सकाळपर्यंत पावसाचा जोर लक्षणीयरीत्या कमी झाला. आज खडकवासला येथे 14 मिमी, पानशेत येथे 62 मिमी, वरसगाव येथे 54 मिमी आणि टेमघर येथे 127 मिमी पावसाची नोंद झाली. त्यामुळे कालच्या तुलनेत पावसाचा जोर सुमारे 50 ते 80 टक्क्यांनी घटल्याचे दिसून आले.
पावसाचा वेग कमी झाल्याने धरणांमध्ये होणाऱ्या पाण्याच्या आवकेतही काहीशी घट झाली आहे. मंगळवारी चारही धरणांत 3,637 एमसीएफटी पाण्याची आवक झाली होती, तर बुधवारी ती 3,381 एमसीएफटी इतकी नोंदविण्यात आली. म्हणजेच एका दिवसात 256 एमसीएफटीने आवक घटली आहे.
तथापि, डोंगरदऱ्यांतील ओढे-नाले अद्यापही वाहते असून घाटमाथ्यावर सुरू असलेल्या पावसामुळे धरणांकडे पाण्याचा ओघ कायम आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांतही धरणांतील उपयुक्त पाणीसाठ्यात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
----------------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु