
मुंबई, 09 जुलै (हिं.स.)। पनवेल परिसरातील वारंवार होणाऱ्या वीज खंडिततेच्या पार्श्वभूमीवर वितरण व्यवस्था सक्षम करण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. यासाठी पायाभूत सुविधा प्रकल्प हाती घेण्यात आले असून, वीजपुरवठा अधिक स्थिर व विश्वासार्ह करण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला आहे, अशी माहिती राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी विधानपरिषदेत दिली.
सदस्य विक्रांत पाटील यांनी नियम ९२ अन्वये पनवेल परिसरातील वीजपुरवठा खंडिततेबाबत चर्चा उपस्थित केली होती.
यावेळी राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी सांगितले की, एप्रिल, मे आणि जून महिन्यांतील तीव्र उष्णतेच्या लाटेमुळे वीज मागणीत मोठी वाढ झाली. वाढत्या भारामुळे काही ठिकाणी वितरण यंत्रणेवर ताण निर्माण झाला.
पनवेल परिसरातील वीज समस्या सोडविण्यासाठी विविध पायाभूत सुविधा प्रकल्प राबविण्यात येत असून, त्यासाठी सुमारे २०१.७२ कोटी रुपयांचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. या माध्यमातून उपकेंद्रांची क्षमता वाढविणे, नवीन वीजवाहिन्या उभारणे आणि वितरण व्यवस्था अधिक सक्षम करण्याची कामे करण्यात येणार आहेत.
या उपाययोजनांमुळे पनवेल परिसरातील वाढती वीज मागणी पूर्ण होऊन वीजपुरवठा अधिक स्थिर व विश्वासार्ह होण्यास मदत होणार असल्याचे राज्यमंत्री साकोरे-बोर्डीकर यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर