पुण्यातील वाहतूक प्रकल्पांसाठी राज्य शासनाची ‘पुणे वाहतूक समिती’ स्थापन
पुणे, 9 जुलै (हिं.स.) : शहरातील भुयारी मार्ग, एचसीएमटीआर (HCMTR) आणि रिंगरोड यांसारख्या महत्त्वाच्या वाहतूक प्रकल्पांची नियोजनबद्ध अंमलबजावणी, वित्तीय व्यवस्थापन आणि प्रभावी देखरेख करण्यासाठी राज्य शासनाने ‘पुणे वाहतूक समिती’ स्थापन केली आहे. यासं
Ring Road Pune


पुणे, 9 जुलै (हिं.स.) : शहरातील भुयारी मार्ग, एचसीएमटीआर (HCMTR) आणि रिंगरोड यांसारख्या महत्त्वाच्या वाहतूक प्रकल्पांची नियोजनबद्ध अंमलबजावणी, वित्तीय व्यवस्थापन आणि प्रभावी देखरेख करण्यासाठी राज्य शासनाने ‘पुणे वाहतूक समिती’ स्थापन केली आहे. यासंदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

समितीची रचना दोन स्तरांवर करण्यात आली असून, उच्चस्तरीय समितीच्या अध्यक्षपदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर कार्यकारी समितीचे अध्यक्ष म्हणून पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

पुण्यातील महत्त्वाचे वाहतूक प्रकल्प निर्धारित वेळेत आणि गतीने पूर्ण करण्यासाठी विशेष उद्देश संस्था (SPV) स्थापन करण्याचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले होते. त्यानुसार पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी जून महिन्यात शासनाकडे प्रस्ताव सादर केला होता. त्या प्रस्तावाच्या अनुषंगाने शासनाने समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला.

उच्चस्तरीय समितीत उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री, उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री, नगरविकास राज्यमंत्री, मुख्य सचिव, विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, पुण्याचे महापौर, सभागृह नेते, स्थायी समितीचे अध्यक्ष आणि पुणे महापालिका आयुक्त यांचा समावेश करण्यात आला आहे.

याशिवाय, इनर रिंग रोड प्रकल्पाच्या अनुषंगाने पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे महापौर, आयुक्त आणि संबंधित पदाधिकारी तसेच पीएमआरडीएचे आयुक्त यांचाही समितीत समावेश करण्यात आला आहे. या विविध यंत्रणांमधील समन्वयामुळे शहरातील वाहतूक प्रकल्पांच्या अंमलबजावणीला अधिक गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

--------------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande