
पुणे, 09 जुलै (हिं.स.)।
शहरातील पावसाळ्यात पाणी साचणाऱ्या ३९ ठिकाणांवरील समस्या कायमस्वरूपी सोडविण्यासाठी स्वतंत्र अधिकाऱ्यांची नियुक्ती करून त्यांची जबाबदारी निश्चित करावी, तसेच आपत्कालीन नियोजनासह सुरू असलेल्या कामांचा नियमित आढावा घ्यावा, असे निर्देश पुणे महापालिकेच्या स्थायी समितीने प्रशासनाला दिले आहेत.
शहरातील ३९ वॉटर लॉगिंग स्पॉट्सपैकी अनेक ठिकाणी अद्याप कायमस्वरूपी उपाययोजना पूर्ण झालेल्या नसल्याची बाब समितीच्या बैठकीत समोर आली. मान्सूनपूर्वी वाहतूक पोलिसांनी संबंधित विभागांना सूचना करूनही अनेक भागांमध्ये पावसाचे पाणी साचत असल्याने वाहतूक कोंडी, अपघातांचा धोका आणि नागरिकांची गैरसोय कायम असल्याचे स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी निदर्शनास आणून दिले.
भिमाले यांनी सांगितले की, रस्ते खचणे, खड्ड्यांचे वाढते प्रमाण आणि विविध विकासकामे अपूर्ण राहिल्याने अनेक ठिकाणी परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. विविध विभागांमध्ये प्रभावी समन्वयाचा अभाव असल्यामुळे दीर्घकालीन उपाययोजनांऐवजी तात्पुरत्या उपायांवर भर दिला जात असल्याची बाबही त्यांनी अधोरेखित केली.
या पार्श्वभूमीवर प्रत्येक पाणी साचणाऱ्या ठिकाणासाठी जबाबदार अधिकारी निश्चित करून कायमस्वरूपी उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी आणि कामांच्या प्रगतीवर सातत्याने देखरेख ठेवावी, असे निर्देश स्थायी समितीने महापालिका प्रशासनाला दिले आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु