
पुणे, 09 जुलै (हिं.स.)।
जगतगुरू संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा लोणी काळभोर (कदमवाक वस्ती) येथील एकादशीचा मुक्काम पूर्ण करून रविवार, १२ जुलै रोजी दुपारी सुमारे १ वाजता उरुळी कांचन येथे विसाव्यासाठी दाखल होणार आहे. या पार्श्वभूमीवर पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या मालकीच्या जागेत ८० फूट रुंद, २०० फूट लांब आणि सुमारे २० फूट उंच असा भव्य जलावरोधक मंडप उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.
पावसाळ्याचा विचार करून वारकरी आणि भाविकांना सुरक्षित निवारा मिळावा, यासाठी मंडपाची उभारणी केली जात आहे. तसेच मंडपाभोवतीच्या परिसरात मुरमीकरण करून पावसाचे पाणी साचणार नाही, याची विशेष काळजी घेतली जात आहे. त्यामुळे पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या वारकरी बांधवांसह पंचक्रोशीतील भाविकांची गैरसोय टळणार आहे.
दरम्यान, देहू ते पंढरपूर या पालखी मार्गावरील दुपारच्या विसाव्याच्या आणि रात्रीच्या मुक्कामाच्या ठिकाणी जलावरोधक मंडप उभारण्याचे काम एकाच निविदेद्वारे हाती घेण्यात आले आहे. हा उपक्रम सोलापूर जिल्हा परिषद, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजना आणि ग्रामविकास विभाग यांच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे.
पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांतील ज्या ठिकाणी प्रशस्त निवाऱ्याची सुविधा उपलब्ध नाही, त्या ठिकाणी वारकऱ्यांना पावसापासून संरक्षण मिळावे यासाठी अशा जलावरोधक मंडपांची उभारणी केली जात असल्याची माहिती हवेली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शेखर शेलार यांनी दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु