
अमरावती, 01 ऑगस्ट (हिं.स.) | शहरात एमडीतस्करी विरोधात शहर पोलिसांची कारवाई सुरू असली तरी, त्याची तस्करी मोठ्या प्रमाणात सुरूच आहे. सराईतांकडून तस्करी, विक्रीसाठी विधीसंघर्षीतांचा वापर केल्या जात असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. नागपुरीगेट पोलिसांनी शहरातील हाजरानगर परिसरातून एका विधीसंघर्षीत बालकास ताब्यात घेऊन त्याच्याकडून ७ लाख ५० हजार रुपयांचे ३० ग्रॅम एम.डी.ड्रग्स जप्त केले. सोबतच एक मोबाईल आणि १ हजार १०० रुपये रोख असा एकूण ७ लाख ७१ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल विधीसंघर्षीताकडून जप्त करण्यात आला आहे. असे नागपुरीगेटचे पोलिस निरीक्षक मनोहर कोटनाके यांनी सांगितले.
सदर बालकाच्या संशयास्पद हालचाली लक्षात घेता त्याला नागपुरीगेट पोलिसांनी ताब्यात घेऊन अंगझडती घेतली असता एमडी ड्रग्स सापडले. संशयित शेख सुफियान शेख अशपाक (रा. हाजरानगर) यांच्या सांगण्यावरून हे एमडी ड्रग्स विक्रीकरिता सोबत आणल्याचे विधीसंघर्षीत बालकाने अधिकाऱ्यांपुढे सांगितले. नागपुरीगेट ठाण्यात संशयित विधीसंघर्षीतासह संशयित फरार शेख सुफिया शेख अशपाक अशा दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंमलीपदार्थ विक्रीसंदर्भात ऑपरेशन कवच अंतर्गत कारवाई होत असल्याने आता या गुन्ह्यातील सराईत तस्करांकडून विधीसंघर्षीत बालकांना पैशाचे आमीष दाखवून त्यांचा वापर करण्याचे काम सुरू झाल्याचे या घटनेवरून दिसून येते. आतापर्यंत खून, दरोडा, लुटमारीत विधीसंघर्षीतांचा वापर सराईतांकडून केल्या गेल्याचे बरेच उदाहरणे आहेत. परंतु आता अंमलीपदार्थ तस्करीसाठी सुद्धा हा वापर पोलिसांची डोकेदुखी वाढविणारा आहे.
नागपुरीगेट हद्दीत आहेत हब
अंमलीपदार्थांची तस्करी करणारे आतापर्यंत नागपुरीगेट हद्दीतील परिसरात आढळून येत होते. परंतु आता त्याच भागात अन्य छोटे छोटे एमडीचे हब सुरू झाल्याची स्थिती निर्माण होत असल्याचे बोलल्या जात आहे.
--------------------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी