
तेहरान , 10 ऑगस्ट (हिं.स.)।इराणने आपल्या सुरक्षा व्यवस्थेत मोठा बदल केला आहे. इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांनी इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स अर्थात आयआरजीसीचे माजी प्रमुख मोहसेन रजाई यांची सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेतील आपले प्रतिनिधी म्हणून नियुक्ती केली आहे. रजाई यांनी मोहम्मद बाकिर जुलघद्र यांची जागा घेतली आहे.
इराण अमेरिका आणि इस्रायलसोबत सुरू असलेल्या संघर्षाचा, वाढत्या लष्करी दबावाचा आणि आर्थिक आव्हानांचा सामना करत असताना ही नियुक्ती करण्यात आली आहे. मोहसेन रजाई यांच्याकडे लष्करी आणि सुरक्षा क्षेत्रातील दीर्घ अनुभव आहे. ते आयआरजीसीचे माजी प्रमुख राहिले आहेत. १९८०च्या दशकात झालेल्या इराण-इराक युद्धात त्यांनी लष्करी कमांडर म्हणूनही महत्त्वाची भूमिका बजावली होती. इराणमध्ये या युद्धाला ‘पवित्र संरक्षण’ या नावाने ओळखले जाते.
रजाई सध्या एक्स्पेडिएन्सी डिसर्नमेंट कौन्सिलचे सदस्यही आहेत. ही संस्था इराणची संसद आणि गार्डियन कौन्सिल यांच्यातील मतभेद सोडवण्याचे काम करते. त्यामुळे रजाई यांच्या नियुक्तीमुळे लष्करी तसेच राजकीय क्षेत्रातील अनुभव असलेल्या व्यक्तीचा सुरक्षा परिषदेत समावेश झाला आहे.
मोहसेन रजाई यांच्यापूर्वी सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेत सर्वोच्च नेत्यांचे प्रतिनिधी म्हणून मोहम्मद बाकिर जुलघद्र जबाबदारी सांभाळत होते. आता मोजतबा खामेनेई यांनी त्यांची राजकीय सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे. नियुक्ती आदेशात त्यांच्या अनुभवाचे आणि कार्याचे कौतुक करण्यात आले आहे. यावरून जुलघद्र यांना पूर्णपणे व्यवस्थेबाहेर केलेले नसून त्यांच्यावर आणखी एक महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आल्याचे स्पष्ट होते.या फेरबदलामुळे इराणच्या सर्वोच्च नेतृत्वात सुरक्षा आणि राजकीय विषयांशी संबंधित जबाबदाऱ्यांमध्ये बदल झाल्याचे दिसून येत आहे.
इराणच्या सरकारी प्रसारमाध्यमानुसार, राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेशकियन यांनी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांची भेट घेतली. या बैठकीत देशातील लष्करी आणि आर्थिक परिस्थितीवर चर्चा करण्यात आली. यामध्ये सामान्य नागरिकांच्या गरजा, अमेरिका आणि इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धाची परिस्थिती, लष्करी घडामोडी आणि भविष्यातील रणनीती यांचा समावेश होता.
याशिवाय इराणचे चलन रियाल, परकीय चलन, ऊर्जा खर्च आणि संसाधनांचे व्यवस्थापन यावरही चर्चा झाली. परदेशी देशांसोबत आर्थिक संबंध अधिक मजबूत करण्याच्या उपायांवरही बैठकीत विचारविनिमय करण्यात आला.
दरम्यान, मोजतबा खामेनेई यांच्या प्रकृतीबाबत आणि त्यांच्या सार्वजनिक उपस्थितीबाबतही चर्चा सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इस्रायली माध्यमांमध्ये त्यांच्या प्रकृतीची स्थिती अत्यंत गंभीर असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यानंतर इराणच्या अर्ध-सरकारी न्यूज एजन्सीने एक जुना व्हिडिओ प्रसिद्ध केला. या व्हिडिओमध्ये मोजतबा खामेनेई हे निरोगी दिसत होते.
मात्र, ते सार्वजनिकरित्या समोर न आल्याने त्यांच्या प्रकृतीबाबतच्या अटकळी सुरूच आहेत. अशा परिस्थितीत राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेशकियन यांच्यासोबत त्यांची भेट झाल्याची माहिती समोर येणे हा इराणच्या सध्याच्या नेतृत्वासाठी आणि सत्ता व्यवस्थेसाठी महत्त्वपूर्ण घडामोड मानली जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode