आकाशानंतर आता अभिनयाची भरारी : अक्षत सक्सेनाची नवी कारकीर्द
आकाशात हजारो तास विमान उडवल्यानंतर आता अक्षत सक्सेनाने आपल्या बालपणीच्या स्वप्नाला पंख देत अभिनयाच्या दुनियेत पाऊल ठेवले आहे. त्याच्यासाठी हा प्रवास केवळ एका व्यवसायातून दुसऱ्या व्यवसायात जाण्याची कथा नाही, तर वडिलांचा वारसा, अपूर्ण राहिलेले स्वप्न
अक्षत सक्सेना


आकाशात हजारो तास विमान उडवल्यानंतर आता अक्षत सक्सेनाने आपल्या बालपणीच्या स्वप्नाला पंख देत अभिनयाच्या दुनियेत पाऊल ठेवले आहे. त्याच्यासाठी हा प्रवास केवळ एका व्यवसायातून दुसऱ्या व्यवसायात जाण्याची कथा नाही, तर वडिलांचा वारसा, अपूर्ण राहिलेले स्वप्न आणि स्वतःला एक नवी ओळख देण्याचा भावनिक प्रवास आहे.

अक्षतचे वडील भारतीय हवाई दलातील शूर फायटर पायलट होते. त्यांनी ‘ऑपरेशन सफेद सागर’मध्येही सहभाग घेतला होता. त्यामुळे याच ऑपरेशनवर आधारित प्रकल्पात हवाई दलाचा गणवेश परिधान करून फायटर कंट्रोलरची भूमिका साकारणे हा अक्षतसाठी अत्यंत भावनिक आणि अभिमानाचा क्षण ठरला. लहानपणी रंगमंचावर अभिनय करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या अक्षतने वयाच्या ३३व्या वर्षी आपल्या यशस्वी पायलट कारकीर्दीला निरोप देत अभिनयाला पूर्णपणे वाहून घेण्याचे धाडस दाखवले. ‘ऑपरेशन सफेद सागर’मधून अभिनयाच्या प्रवासाची सुरुवात, वडिलांकडून मिळालेली प्रेरणा आणि कॅमेऱ्यासमोर पहिल्यांदा उभे राहण्याचा भावनिक अनुभव याबाबत अक्षत सक्सेनाने ‘हिंदुस्थान समाचार’शी विशेष संवाद साधला.

प्रश्न : ‘ऑपरेशन सफेद सागर’ हा तुमच्या अभिनयाच्या प्रवासाचा प्रारंभ आहे. या चित्रपटाशी जोडले जाण्याचे विशेष कारण काय होते ?

उत्तर : जेव्हा मला ‘ऑपरेशन सफेद सागर’च्या पटकथेबद्दल सांगण्यात आले, तेव्हापासूनच मला या प्रकल्पात रस निर्माण झाला होता. कारगिल युद्धाच्या काळात मला या ऑपरेशनबद्दल माहिती होती, कारण माझे वडील ‘मिराज २०००’चे पायलट होते आणि त्यांनी ‘ऑपरेशन सफेद सागर’मध्ये अनेक मोहिमा पार पाडल्या होत्या. जेव्हा मला फायटर कंट्रोलरची भूमिका ऑफर करण्यात आली, तेव्हा ती माझ्यासाठी अतिशय रोचक आणि प्रभावी वाटली. फायटर कंट्रोलर्स आणि फायटर पायलट्स भारतीय हवाई दलात अतिशय जवळून एकत्र काम करतात. पटकथा वाचल्यानंतर मला जाणवले की ही कथा वास्तव आणि सत्य घटनांच्या खूप जवळ जाणारी आहे. त्यामुळे मी ही भूमिका स्वीकारण्याचा निर्णय घेतला.

प्रश्न : या चित्रपटातील आपल्या भूमिकेसाठी तुम्ही कोणत्या प्रकारची तयारी केली ?

उत्तर : या भूमिकेच्या तयारीसाठी मी हवाई दलात कार्यरत असलेल्या माझ्या काही मित्रांशी संवाद साधला, जे फायटर कंट्रोलर्स आहेत. त्यांच्याकडून मी त्यांचे दैनंदिन जीवन, ऑपरेशनदरम्यान काम करण्याची पद्धत आणि फायटर पायलट्ससोबतचे त्यांचे संबंध याबद्दल जाणून घेतले. पायलट म्हणूनचा माझा स्वतःचा अनुभवही मला खूप उपयोगी ठरला. मी जवळपास १५ वर्षे रेडिओ टेलिफोनीचा वापर केला आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या संवादामध्ये कशा पद्धतीने बोलले जाते आणि पायलट्सना कोणत्या प्रकारची माहिती आवश्यक असते, याची मला चांगली कल्पना होती. माझा स्वतःचा अनुभव आणि हवाई दलातील फायटर कंट्रोलर मित्रांसोबत झालेली चर्चा हा या भूमिकेच्या तयारीचा महत्त्वाचा भाग होता.

प्रश्न : पायलटपासून अभिनेता होण्याचा प्रवास सुरू करण्याचा विचार तुमच्या मनात कधी आला ?

उत्तर : अभिनेता होण्याचे स्वप्न खरं तर माझ्या बालपणातच सुरू झाले होते. मी ५-६ वर्षांचा असताना माझ्या आईने मला काही नाटकांमध्ये सहभागी करून घेतले होते. साधारण ८ वर्षांचा असताना माझे एक फोटोशूटही झाले होते; मात्र त्यावेळी पुढे काही होऊ शकले नाही. माझे वडील हवाई दलात असल्यामुळे आमच्या दर दोन-तीन वर्षांनी बदल्या होत असत. त्यामुळे मी देशभरातील सुमारे ७-८ शाळांमध्ये शिक्षण घेतले आहे.

स्वप्न बालपणीचे होते, पण ते पूर्ण होऊ शकले नाही. हवाई दलानंतर मी स्वतः पायलट झालो आणि सुमारे १३-१४ वर्षे त्याच व्यवसायात व्यस्त राहिलो. त्यानंतर एक दिवस मला जाणवले की आयुष्य एकदाच मिळते आणि प्रत्येक स्वप्नाला एक संधी दिली पाहिजे. त्यामुळे मी माझी नोकरी सोडून पूर्णपणे अभिनय क्षेत्रात येण्याचा निर्णय घेतला.

त्यानंतर मी मोठ्या प्रमाणावर प्रशिक्षण घेतले. आदिल हुसैन सर, नीरज काबी सर आणि मुकेश छाबडा सर यांच्यासोबत प्रशिक्षण आणि कार्यशाळा केल्या. पद्मश्री पुरस्काराने सन्मानित झालेले बॅरी जॉन सर यांच्यासोबत तीन महिन्यांचा डिप्लोमा कोर्सही केला. अशा प्रकारे अभिनेता होण्यासाठी माझी तयारी झाली.

प्रश्न : पहिल्यांदा कॅमेऱ्यासमोर उभे राहण्याचा अनुभव कसा होता ?

उत्तर : पहिल्यांदा कॅमेऱ्यासमोर येण्याचा अनुभव खूपच चांगला होता. मला वाटते, आयुष्यानेच मला त्यासाठी तयार केले होते. पायलट आणि एअरलाइन क्षेत्रातील व्यावसायिक म्हणूनच्या माझ्या अनुभवामुळे माझ्यात खूप आत्मविश्वास आला होता. त्यानंतर अभिनेता होण्यासाठी मी प्रशिक्षणही घेतले होते, त्यामुळे कॅमेऱ्यासमोर जाण्याबाबत माझ्या मनात एक प्रकारचा आत्मविश्वास होता.

सेटवर खूप मजा आली आणि संपूर्ण टीमही खूप चांगली होती. दिग्दर्शक ओनी सेन हे आतापर्यंत माझ्यासोबत काम केलेल्या सर्वोत्तम दिग्दर्शकांपैकी एक आहेत. त्यामुळे कॅमेऱ्यासमोर काम करणे हा माझ्यासाठी खूप चांगला अनुभव ठरला.

प्रश्न : नवोदित अभिनेता म्हणून चित्रपटाच्या सेटवर तुमच्यासमोर सर्वात मोठे आव्हान कोणते होते ?

उत्तर : तुम्ही कितीही तयारी केलेली असो किंवा कितीही प्रशिक्षण घेतलेले असो, पहिल्यांदा सेटवर गेल्यावर थोडीशी घबराट होतेच. माझ्या मते, ही चांगली गोष्ट आहे. सर्वात मोठे आव्हान होते ते त्या क्षणी पूर्णपणे उपस्थित राहण्याचे.

प्रत्येक अभिनेत्याला शिकवले जाते की सेटला केवळ सेट न समजता त्या परिस्थितीला वास्तव मानून ती जगायची असते. सुरुवातीला माझ्यासाठी हे थोडे कठीण होते. मात्र आमची टीम खूपच उत्तम होती. दिग्दर्शक ओनी सेन सर, सिद्धार्थ, जिम्मी शेरगिल आणि इतर सर्व कलाकार अत्यंत व्यावसायिक होते. त्यांनी सेटवर सर्वांना खूप सहज आणि आरामदायी वातावरण दिले.

संपूर्ण कलाकार आणि तंत्रज्ञांच्या सहकार्यामुळे माझ्यासाठी हा अनुभव खूपच सुखकर झाला.

प्रश्न : विमान उडवणे आणि अभिनय करणे यामध्ये तुम्हाला कोणते साम्य दिसते ?

उत्तर : दोन्ही क्षेत्रांमध्ये बरीच साम्ये आहेत. एक चांगला पायलट होण्यासाठी खूप प्रशिक्षण घ्यावे लागते, अभ्यास करावा लागतो आणि अनुभवासोबत तुमची क्षमता अधिकाधिक विकसित होत जाते. अभिनयातही हेच लागू होते. तुम्हाला औपचारिक प्रशिक्षण घ्यावे लागते आणि त्यानंतर अनुभवासोबत तुम्ही अधिक चांगले अभिनेता बनता.

विमान उडवणे शिकतानाही प्रशिक्षणाचे अनेक टप्पे असतात आणि त्यासाठी बराच वेळ लागतो. त्याचप्रमाणे अभिनयातही सातत्याने शिकत राहणे आवश्यक आहे. सध्या मी जास्तीत जास्त संधी शोधत आहे, जेणेकरून वेगवेगळ्या भूमिका साकारता येतील आणि अभिनेता म्हणून स्वतःला अधिक चांगले घडवता येईल.

प्रश्न : चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान असा कोणता क्षण होता, जो तुम्ही कायम लक्षात ठेवाल ?

उत्तर : हवाई दलाचा गणवेश परिधान करणे हा माझ्यासाठी स्वतःमध्येच अभिमानाचा आणि सन्मानाचा क्षण होता. हा एका सैनिकाचा गणवेश आहे आणि माझ्यासाठी तो खूप वैयक्तिकही आहे, कारण माझे वडील स्वतः भारतीय हवाई दलातील अत्यंत सन्माननीय आणि प्रतिष्ठित फायटर पायलट होते.

‘मिराज २०००’ हे विमान फ्रान्समधून भारतात आणून १९८५ मध्ये भारतीय हवाई दलात समाविष्ट करण्यामध्येही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांनी ‘ऑपरेशन सफेद सागर’मध्येही सहभाग घेतला होता. त्यामुळे त्यांच्यासारखाच गणवेश परिधान करणे ही माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट होती.

दुसरा विशेष क्षण म्हणजे माझे अभिनयगुरू आदिल हुसैन सर यांच्यासोबत काम करण्याचा. माझी पहिली अभिनय कार्यशाळा मी त्यांच्यासोबत केली होती. जेव्हा मी त्यांना फोन करून सांगितले की मी ‘ऑपरेशन सफेद सागर’मध्ये काम करत आहे, तेव्हा त्यांनी सांगितले की तेही या प्रकल्पाचा भाग आहेत.

जेव्हा आम्ही पहिल्यांदा सेटवर एकत्र होतो आणि तेही हवाई दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या गणवेशात होते, तेव्हा त्यांच्यासोबत सेट आणि स्क्रीन शेअर करणे माझ्यासाठी खूप मोठे भाग्य होते. सेटवर त्यांच्याकडून मला खूप काही शिकायला मिळाले.

प्रश्न : तब्बल ८,००० तास विमान उडवल्यानंतर कॅमेऱ्यासमोर उभे राहणे किती वेगळा अनुभव आहे ?

उत्तर : मला खूप आनंद झाला. पायलट म्हणून मी नेहमीच प्रवाशांशी संवाद साधत असे. एअरलाइनमध्ये काम करताना विमानाला उशीर झाला किंवा काही समस्या निर्माण झाली, तर प्रवाशांना योग्य माहिती देणे ही माझी जबाबदारी असायची.

मी अनेक वर्षे ती नोकरी खूप आनंदाने केली आणि प्रवाशांशी भरपूर संवाद साधला. कदाचित याच कारणामुळे कॅमेऱ्यासमोर मला कोणतीही भीती वाटली नाही. जेव्हा तुम्ही कॅमेऱ्यासमोर एखादी भूमिका साकारत असता, तेव्हा पायलट म्हणूनच्या माझ्या अनुभवामुळे मला कुठेतरी असा आत्मविश्वास मिळाला की मी हे सहज करू शकतो.

मला खूप सहज वाटले. जणू काही मी विमानाचा कॅप्टनच आहे, असे वाटत होते. माझे असे मत आहे की प्रत्येक भूमिका—ती छोटी असो किंवा मोठी—आपापल्या जागी महत्त्वाची असते. त्यामुळे मी माझी भूमिका त्याच आत्मविश्वासाने साकारली.

प्रश्न : भविष्यातही अभिनयासोबत विमान वाहतूक क्षेत्राशी आपले नाते कायम ठेवू इच्छिता का ?

उत्तर : नक्कीच. सध्या मी अभिनयामध्ये पूर्णपणे गुंतलेलो आहे, कारण माझे एक तत्त्व आहे—जे काही काम करायचे, ते २०० टक्के समर्पणाने करायचे. मी माझी नोकरी यासाठी सोडली की अभिनयाला माझा पूर्ण वेळ, लक्ष आणि मेहनत देता यावी.

त्यावेळी मी चांगल्या आणि उच्च पदावर होतो आणि माझी कारकीर्दही खूप चांगली सुरू होती. मात्र अभिनयाला पूर्ण संधी देण्याचा मी निर्णय घेतला. तरीही विमानाशी माझे नाते कायम राहणार आहे.

मी पायलट्सच्या तिसऱ्या पिढीतील आहे. माझे आजोबा पायलट होते, माझे वडील पायलट होते आणि मीही पायलट आहे. त्यामुळे विमान हे माझ्या आयुष्याचा कायमच एक भाग राहतील. देवाची इच्छा असेल तर एक दिवस स्वतःचे विमान खरेदी करून ते उडवण्याचे स्वप्नही नक्की पूर्ण करेन.अभिनय आणि विमान या दोन्हींशी माझे नाते कायमच जोडलेले राहील असे त्याने स्पष्ट केले.

-------------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande