


- कौमी इन्साफ मोर्चाकडून २१ ऑगस्ट रोजी पंजाब बंदची घोषणा
चंदीगड, 15 ऑगस्ट (हिं.स.)। पंजाबच्या तुरुंगांमध्ये शिक्षा पूर्ण केलेल्या शीख कैद्यांच्या सुटकेच्या मागणीसाठी शनिवारी कौमी इंसाफ मोर्चाच्या आंदोलकांनी मोहालीहून चंदीगडच्या दिशेने कूच करण्याचा प्रयत्न केला. चंदीगड सीमेवर अनेक तास चाललेल्या गोंधळादरम्यान पोलिसांनी जमावाला नियंत्रित करण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि वॉटर कॅननचा वापर केला. मोर्चाने आंदोलन अधिक तीव्र करत 21 ऑगस्ट रोजी पंजाब बंदची घोषणा केली आहे.
कौमी इंसाफ मोर्चाकडून 7 जानेवारी 2023 पासून मोहालीमध्ये चंदीगडच्या सीमेवर बंदी शीखांच्या सुटकेसाठी धरणे आंदोलन सुरू आहे. येथे शेकडो शीख समुदायातील लोक तुरुंगात असलेले जगतार सिंह हवारा व त्याचे साथीदार, बलवंत सिंह राजोआणा यांच्यासह अनेक कट्टरपंथीयांच्या सुटकेची मागणी करत आहेत. कौमी इंसाफ मोर्चाने यापूर्वीही उग्र आंदोलन केले आहे.
शनिवारच्या आंदोलनापूर्वी तुरुंगात बंद असलेल्या जगतार सिंह हवाराचा एक व्हिडिओ संदेशही जारी करण्यात आला, जो धरणे स्थळी दाखवण्यात आला. व्हिडिओमध्ये हवाराने आंदोलन शांततापूर्ण ठेवण्याचे आवाहन केले होते. असे असूनही मोहाली-चंदीगड सीमेवर आंदोलक आणि पोलिसांमध्ये संघर्षाची परिस्थिती निर्माण झाली. पोलीस महासंचालक सागरप्रीत हुड्डा हे देखील घटनास्थळी पोहोचले.
कौमी इंसाफ मोर्चाच्या नेतृत्वाखाली मोहालीहून चंदीगडमधील राज्यपाल भवनाकडे जाणारे आंदोलक वायपीएस चौकाजवळ जमले. त्यांना रोखण्यासाठी चंदीगड पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून सकाळपासूनच सीमा सील केली होती. संतप्त जमावाने ट्रॅक्टरच्या मदतीने बॅरिकेडिंग तोडण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी पोलिसांनी वॉटर कॅननचा वापर केला. त्यानंतरही आंदोलक माघार घेत नसल्याने त्यांना पांगवण्यासाठी गन आणि ड्रोनच्या मदतीने त्यांच्यावर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या.
चंदीगडमधील राज्यपाल भवनाजवळ पोहोचलेले शिरोमणी अकाली दल (अमृतसर)चे अध्यक्ष आणि माजी खासदार सिमरनजीत सिंह मान यांना ताब्यात घेण्यात आले. या गोंधळादरम्यान डझनभर आंदोलक तसेच पोलीस कर्मचारी जखमी झाले. परिस्थिती पाहता चंदीगडचे उपायुक्त निशांत यादव, डीजीपी सागरप्रीत हुड्डा आणि एसएसपी कंवरदीप कौर घटनास्थळी पोहोचले.
अनेक तासांच्या गोंधळानंतर कौमी इंसाफ मोर्चाच्या नेत्यांनी घोषणा केली की, आजचा कार्यक्रम यशस्वी झाला आहे. आता आम्ही पुढे जाणार नाही. 21 ऑगस्ट रोजी पंजाब बंद करू. नेत्यांनी सांगितले की, पोलीस चंदीगडकडे जाणारा मार्ग बंद करतात. आम्ही कोणताही मार्ग बंद करत नाही. आजही मार्ग पोलिसांनीच बंद केला होता.
चंदीगडच्या एसएसपी कंवरप्रीत कौर यांनी सांगितले की, कौमी इंसाफ मोर्चाने 15 ऑगस्ट रोजी पंजाब लोक भवन येथे जाण्याची घोषणा केली होती. त्यांच्या अनेक मागण्या होत्या. गेल्या दोन आठवड्यांपासून प्रशासनाची मोर्चाच्या नेत्यांसोबत चर्चा सुरू होती. त्यांना आंदोलन शांततापूर्ण असावे, असे सांगण्यात आले होते. आज काही लोकांनी बॅरिकेड तोडण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना वारंवार इशारा दिला. काही लोकांकडे धारदार शस्त्रे होती. त्यांनी पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर अश्रुधुराच्या नळकांड्या आणि वॉटर कॅननच्या मदतीने त्यांना मागे हटवण्यात आले. आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेकही केली आहे. अनेक पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. सध्या परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे. आंदोलक आपल्या बॅरकच्या दिशेने निघून गेले आहेत. काही लोकांनी चंदीगडमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता, त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule