‘बाबांनी माझ्या स्वप्नांना कधीच बंधन घातलं नाही’; हेमांगी कवीने सांगितला स्वातंत्र्याचा अर्थ
मुंबई, 15 ऑगस्ट (हिं.स.)। स्वातंत्र्यदिनानिमित्त ‘सन मराठी’वरील ‘तू अनोखी तरी सोबती’ मालिकेत नीलांबरीची नकारात्मक भूमिका साकारणारी अभिनेत्री हेमांगी कवी हिने स्वातंत्र्यदिनाच्या बालपणीच्या आठवणी सांगितल्या. याचसह सेटवर साजऱ्या होणाऱ्या स्वातंत्र्य
कवी


मुंबई, 15 ऑगस्ट (हिं.स.)। स्वातंत्र्यदिनानिमित्त ‘सन मराठी’वरील ‘तू अनोखी तरी सोबती’ मालिकेत नीलांबरीची नकारात्मक भूमिका साकारणारी अभिनेत्री हेमांगी कवी हिने स्वातंत्र्यदिनाच्या बालपणीच्या आठवणी सांगितल्या. याचसह सेटवर साजऱ्या होणाऱ्या स्वातंत्र्यदिनाचा अनुभव सांगितला. तसेच, देशाच्या स्वातंत्र्यासोबतच आयुष्यात स्वतःची स्वप्नं पाहण्याचं आणि ती पूर्ण करण्याचं स्वातंत्र्य किती महत्त्वाचं आहे, याबद्दलही तिने भावना व्यक्त केल्या.

अभिनेत्री हेमांगी कवी म्हणाली की, “शाळेत असताना स्वातंत्र्यदिनाची तयारी म्हणजे आमच्यासाठी एक वेगळाच उत्साह असायचा. मी स्पोर्ट्स गर्ल असल्यामुळे झेंडावंदनाची तयारी, ढोल-ताशे आणि ५२ सेकंदांत ‘राष्ट्रगीत’ म्हणण्याची प्रॅक्टिस, या सगळ्या गोष्टींची आम्ही खूप मनापासून तयारी करायचो. आधल्या रात्री पांढऱ्या गणवेशाला इस्त्री करून ठेवण्यापासून ते दुसऱ्या दिवशी शाळेत झेंडावंदन करून घरी आल्यानंतर कॉलनी किंवा बिल्डिंगमध्ये स्वातंत्र्यदिन साजरा करण्यापर्यंतच्या त्या सगळ्या आठवणी आजही तितक्याच ताज्या आहेत. मालिकांमध्ये काम करायला सुरुवात केल्यानंतरही सेटवर स्वातंत्र्यदिन साजरा करण्याची संधी मिळते. संपूर्ण युनिट एकत्र येऊन ‘राष्ट्रगीत’ म्हणतं, तेव्हा मनात एक वेगळाच उत्साह निर्माण होतो. आपल्या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी आपले प्राण दिले आहेत, याची जाणीव आपल्याला कायम असते; मात्र स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी ती जाणीव अधिक तीव्र होते. भारतात जन्माला आल्याचा मला मनापासून अभिमान आहे. विशेषतः एक स्त्री म्हणून मला माझं मत मांडण्याचं, व्यक्त होण्याचं आणि स्वतःचे निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य मिळालं आहे, याचं मला खूप महत्त्व वाटतं. त्यामुळे मराठी किंवा महाराष्ट्रीयन असण्यासोबतच ‘आपण एक भारतीय आहोत’, याचा मला कायम सार्थ अभिमान वाटतो.

यापुढे ती म्हणाली की, माझ्यासाठी स्वातंत्र्याचा अर्थ केवळ देशाच्या स्वातंत्र्यापुरता मर्यादित नाही, तर तो माझ्या वैयक्तिक आयुष्याशीही जोडलेला आहे. माझ्या बाबांनी आणि ताईने मला नेहमीच स्वतःची स्वप्नं पाहण्याचं आणि ती पूर्ण करण्याचं स्वातंत्र्य दिलं. मध्यमवर्गीय कुटुंबातून आले असूनही बाबांनी माझ्यावर कधीच बंधनं लादली नाहीत. कपड्यांपासून ते करिअरच्या निवडीपर्यंत त्यांनी माझ्या प्रत्येक निर्णयाला पाठिंबा दिला. मला आधी आर्टिस्ट आणि नंतर ॲक्टर व्हायचं होतं, कामानिमित्त रात्री १ वाजता घरी परतायचे तेव्हाही त्यांनी मला कधीच थांबवलं नाही. आजही मला वाटतं की प्रत्येक मुलीला तिच्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्याचं हे स्वातंत्र्य मिळायला हवं. मी खूप भाग्यवान आहे की माझ्या घरात मला आणि माझ्या बहिणीला हे स्वातंत्र्य होतं. लग्नानंतरही माझ्या नवऱ्याने मला तितकाच पाठिंबा आणि स्वातंत्र्य आहे. त्यामुळे देशाच्या स्वातंत्र्याबरोबरच आयुष्यात स्वतःच्या पद्धतीने जगण्याचं स्वातंत्र्य मिळालं, यासाठी मी स्वतःला खूप भाग्यवान समजते.”

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande