
कोलकाता, 16 ऑगस्ट (हिं.स.)। बीरभूम जिल्ह्यातील रामपूरहाटचे तृणमूल काँग्रेसचे माजी आमदार आणि पश्चिम बंगाल विधानसभेचे माजी उपाध्यक्ष
आशीष बॅनर्जी यांचा रविवारी सकाळी रहस्यमय परिस्थितीत मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह रामपूरहाट शहरातील त्यांच्या घराला लागून असलेल्या पक्ष कार्यालयात फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली.
स्थानिक लोकांनी सर्वप्रथम पक्ष कार्यालयाच्या खिडकीतून आशीष बॅनर्जी यांना फासावर लटकलेल्या अवस्थेत पाहिले. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. पोलीस सूत्रांनुसार, घटनास्थळावरून एक सुसाईड नोटही जप्त करण्यात आली आहे.
स्थानिक सूत्रांनुसार, शनिवारी आशीष बॅनर्जी यांची अनेक पक्षनेते आणि कार्यकर्त्यांनी भेट घेतली होती. त्यांचे घर रामपूरहाटच्या पाच क्रमांकाच्या वॉर्डमधील हाटतला पाडा परिसरात आहे. 2026 च्या विधानसभा निवडणुकीत रामपूरहाटमधून भाजपचे ध्रुव साहा यांच्या हातून निवडणूक हरल्यानंतर आशीष बॅनर्जी सक्रिय राजकारणापासून काही प्रमाणात दूर झाले होते.
‘मास्टरमशाई’ या नावाने परिचित असलेल्या या ज्येष्ठ नेत्याचे नाव नुकत्याच समोर आलेल्या कथित भ्रष्टाचाराच्या प्रकरणाशीही जोडले जात होते. पोलिसांनी अद्याप सुसाईड नोटबाबत अधिकृतपणे कोणतीही सविस्तर माहिती दिलेली नाही. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर आणि पोलीस तपासातूनच त्यांच्या मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होऊ शकेल.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule