
डॉ. दाभोलकर स्मृतिदिनानिमित्त विविध कार्यक्रम
मुंबई, 18 ऑगस्ट (हिं.स.)। मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात मंगळवारी महत्त्वपूर्ण निर्णय दिला. या प्रकरणात दोषी ठरवण्यात आलेला सचिन अंदुरे याला न्यायालयाने जामीन मंजूर केला असून, पुण्यातील विशेष न्यायालयाने सुनावलेल्या जन्मठेपेच्या शिक्षेलाही स्थगिती दिली आहे. न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती रणजितसिंह भोसले यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. सचिन अंदुरे याला मिळालेल्या जामिनाच्या निर्णयाचा अभ्यास करण्यात येणार असून, त्यानंतर या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचं मिलिंद देशमुख यांनी स्पष्ट केलं.
तर मुंबई उच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर प्रतिक्रिया देताना नरेंद्र दाभोळकर यांचा मुलगा हमिद दाभोळकर यांनी, 'अजून विस्तृत निकाल आलेला नाही. तो वाचल्यानंतर पुढं काय करायचं याचा निर्णय घेण्यात येईल. या प्रकरणातील सहआरोपी शरद कळसकरला देखील एप्रिल महिन्यात जामीन मंजूर झाला आहे. त्याविरोधात आम्ही सर्वोच्च न्यायालयात अपिल दाखल केली आहे. या प्रकरणातही आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाऊ.' असे सांगितले.
'आधी कळसकर त्यानंतर आता अंदुरेला उच्च न्यायालयाने जामीन दिला. जर या दोघांनी खून केला नाही तर मग कोणी खून केला हे आपल्याला १३ वर्षात शोधता आलं नाही का? या दोघांना सीबीआयने समाजासाठी घातक असं म्हटलं होतं. आताचे बुवाबाजीचे प्रकार पाहता आपण कोणत्या जगात जगतोय हा प्रश्नच पडतोय.' अशी उद्विग्न प्रतिक्रिया देखील मुक्ता दाभोळकर यांनी दिली.
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची २० ऑगस्ट २०१३ रोजी पुण्यातील ओंकारेश्वर परिसरातील महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर सकाळी चालत असताना दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. या घटनेनंतर सुरुवातीला पुणे पोलिसांनी तपास केला. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार २०१४ मध्ये केंद्रीय अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयने तपास हाती घेतला. तपासादरम्यान या हत्येच्या कथित कटाचा तपास करण्यात आला आणि अनेक आरोपींची नावे समोर आली. १० मे २०२४ रोजी पुण्यातील विशेष न्यायालयाने सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना डॉ. दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. दोघांनाही प्रत्येकी पाच लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला होता. तर डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली होती.
दरम्यान, या प्रकरणातील सहआरोपी शरद कळसकर यालाही एप्रिल २०२६ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. त्यामुळे आता जन्मठेपेची शिक्षा झालेल्या दोन्ही दोषींना उच्च न्यायालयाकडून जामीन मिळाला आहे. अंदुरेच्या जामीन अर्जावरील सुनावणीदरम्यान आरोपींची ओळख पटवण्याच्या प्रक्रियेबाबतही न्यायालयाने गंभीर प्रश्न उपस्थित केल्याचे वृत्त आहे. विशेषतः साक्षीदारांना आरोपीची छायाचित्रे दाखवून ओळख पटवण्यात आल्याबाबत न्यायालयाने शंका व्यक्त केली.
दाभोलकरांच्या कुटुंबाकडून अंदुरेच्या जामिनाला विरोध
सचिन अंदुरेच्या जामिनाला आंदोलन दाभोलकरांच्या कुटुंबाने विरोध केला. ‘अंदुरेला जामीन मिळाल्यास समाजात चुकीचा संदेश जाईल. फक्त नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे, पत्रकार गौरी लंकेश, एम. एम. कलबुर्गी या विचारवंताची अशीच हत्या करण्यात आली होती. त्यांचा आवाज दाबण्यासाठी सुनियोजित कट रचण्यात आला होता, असा युक्तिवाद दाभोलकर यांच्या कुटुंबीयांनी केला.
डॉ. दाभोलकर स्मृतिदिनानिमित्त विविध कार्यक्रम
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त समितीतर्फे पुण्यात 20 ते 22 ऑगस्टदरम्यान वैज्ञानिक दृष्टिकोन, विवेकवाद आणि सामाजिक परिवर्तनाचा संदेश देणाऱ्या चार विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे, अशी माहिती अंनिसचे कार्यकारिणी सदस्य मिलिंद देशमुख यांनी दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule