
गुवाहाटी, 16 ऑगस्ट (हिं.स.)। आसाममधील पुराचा प्रभाव आता केवळ पाच जिल्ह्यांपुरता मर्यादित राहिला आहे. परिस्थितीत वेगाने सुधारणा होत आहे. सर्व नद्या धोक्याच्या पातळीखाली वाहत आहेत. प्रभावित लोक जीवन पुन्हा पूर्वपदावर आणण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत. सरकारकडून मदतीसाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले जात आहेत. प्रशासनाकडून प्रामुख्याने शाळांची व्यवस्था पूर्वपदावर आणण्यासाठी आवश्यक पावले उचलली जात आहेत. पूरग्रस्तांसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे.
आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या १५ ऑगस्टच्या आकडेवारीनुसार, सर्व नद्या धोक्याच्या पातळीखाली वाहत आहेत. पुरामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या १०५ वर पोहोचली आहे. पुरामुळे सर्वाधिक नुकसान शिवसागर जिल्ह्यात झाले आहे. प्रभावित जिल्ह्यांमध्ये गोलाघाट, होजाई, नागांव, शिवसागर आणि जोरहाट यांचा समावेश आहे. या जिल्ह्यांतील १६ महसूल मंडळांमधील एकूण २३५ गावे प्रभावित झाली आहेत. सध्या राज्यातील एकूण ६२४४३ लोकसंख्या अजूनही प्रभावित आहे आणि ४९५४.४३ हेक्टर कृषी जमीन पाण्याखाली आहे.
राज्य सरकारने पूरग्रस्त लोकांसाठी अद्याप एकूण २८ मदत छावण्या आणि ९ मदत वितरण केंद्रांसह एकूण ३७ छावण्या कार्यरत ठेवल्या आहेत. मदत छावण्यांमध्ये ४८७७ लोकांनी आश्रय घेतला आहे. मदत वितरण केंद्रांवर ५८९२ छावणीबाहेरील रहिवाशांना मदत मिळत आहे. पुरातील मदत आणि बचाव कार्यात एसडीआरएफ, डीडीआरएफ, पोलीस, अग्निशमन दल आदी यंत्रणा कार्यरत आहेत. पुरामुळे मोठ्या प्रमाणावर रस्ते, पूल आणि इतर पायाभूत सुविधांचे नुकसान झाले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule