वांगणीत गांजा आणि एमडी ड्रग्जचा साठा जप्त; दोन आरोपी अटकेत
रायगड, 16 ऑगस्ट (हिं.स.)। ठाणे ग्रामीण जिल्ह्यात अमली पदार्थांच्या अवैध धंद्यांविरोधात पोलिसांनी धडक मोहीम सुरू केली असून, कुळगाव पोलिसांनी वांगणी परिसरात कारवाई करत गांजा आणि एमडी ड्रग्जचा साठा जप्त केला. घरातून अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या एका
Drug den destroyed in Vangani


Drug den destroyed in Vangani


रायगड, 16 ऑगस्ट (हिं.स.)। ठाणे ग्रामीण जिल्ह्यात अमली पदार्थांच्या अवैध धंद्यांविरोधात पोलिसांनी धडक मोहीम सुरू केली असून, कुळगाव पोलिसांनी वांगणी परिसरात कारवाई करत गांजा आणि एमडी ड्रग्जचा साठा जप्त केला. घरातून अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या एका आरोपीला अटक केल्यानंतर त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी अंबरनाथ येथे सापळा रचून दुसऱ्या आरोपीलाही ताब्यात घेतले.

पोलीस अधीक्षक विनयकुमार राठोड यांनी जिल्ह्यात गांजा, अमली पदार्थ, गुटखा, दारू आणि इतर अवैध व्यवसायांविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार कुळगाव पोलिसांनी अवैध धंद्यांबाबत माहिती संकलित करून कारवाई सुरू केली. याचदरम्यान साईनगर, वांगणी पश्चिम येथील एका घरात अमली पदार्थांचा साठा असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली.

पोलिसांनी तातडीने घटनास्थळी जाऊन घराची झडती घेतली. यावेळी साहिल सलीम शेख (३५) याच्याकडून ५५.४१० ग्रॅम गांजा, ५.४५० ग्रॅम एमडी ड्रग्ज, ४९० रुपये रोख आणि ओप्पो कंपनीचा मोबाईल असा एकूण १ लाख २० हजार ७९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. साहिलला पोलिसांनी अटक केली.

चौकशीदरम्यान साहिलने एमडी ड्रग्जचा पुरवठा अल्लाबक्ष गुणोडवली शेख (४५, अंबरनाथ) याच्याकडून होत असल्याची माहिती दिल्याचे पोलिसांनी सांगितले. या माहितीची खातरजमा करून पोलिसांनी अंबरनाथ पश्चिम रेल्वे स्थानकाबाहेरील कुमार अँड सन्स ज्वेलर्स परिसरात सापळा रचला. अमली पदार्थांचा व्यवहार करण्यासाठी आलेल्या अल्लाबक्षला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून २० ग्रॅम एमडी ड्रग्ज आणि २६ हजार ९०० रुपये रोख असा एकूण ४ लाख २६ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

दोन्ही आरोपींकडून मिळून एकूण ५ लाख ४७ हजार ६९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी कुळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २३०/२०२६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, अमली पदार्थांच्या पुरवठा साखळीत आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक विनयकुमार राठोड, अपर पोलीस अधीक्षक अनमोल मित्तल आणि उपविभागीय पोलीस अधिकारी निखिल लसणे यांच्या मार्गदर्शनाखाली कुळगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे, पोलीस उपनिरीक्षक प्रशांत चव्हाण आणि त्यांच्या पथकाने केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रशांत सुभाष चव्हाण करीत आहेत.

-----------------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande