
बर्लिन, 16 ऑगस्ट (हिं.स.)।जर्मनीतील म्युनिक विमानतळावर मोठा अपघात टळला. हनोईला जाणाऱ्या व्हिएतनाम एअरलाइन्सच्या बोईंग 787 विमानाने उड्डाण केल्यानंतर काही वेळातच आपत्कालीन लँडिंग करावी लागली.
फ्लाइट-ट्रॅकिंग वेबसाइटनुसार, उड्डाण घेताना विमान धावपट्टीच्या पुढे गेल्याची माहिती समोर आली. त्यानंतर विमानातील इंधनाचे प्रमाण कमी करण्यासाठी विमानाने दोन तासांहून अधिक काळ हवेत घिरट्या घातल्या. एअरलाइनने आपल्या अधिकृत निवेदनात विमान उड्डाण केल्यानंतर तांत्रिक बिघाडामुळे म्युनिक विमानतळावर परतल्याची पुष्टी केली आहे. मात्र, या तांत्रिक बिघाडाचे नेमके कारण एअरलाइनने स्पष्ट केलेले नाही.
एअरलाइनने सांगितले की, फ्लाइट क्रूने सुरक्षेशी संबंधित सर्व निर्धारित प्रक्रियांचे पालन केले आणि म्युनिक विमानतळावर विमानाचे सुरक्षित लँडिंग करण्यात आले. विमानातील सर्व प्रवासी आणि केबिन क्रूचे सदस्य पूर्णपणे सुरक्षित आहेत. या घटनेची चौकशी करण्यासाठी संबंधित अधिकारी आणि यंत्रणांसोबत मिळून काम करत असल्याचेही कंपनीने सांगितले.
या घटनेनंतर म्युनिक विमानतळ प्रशासनाने आपल्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, उत्तर धावपट्टी बंद करण्यात आली आहे. त्यामुळे हवाई वाहतुकीला काही प्रमाणात विलंब होण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विमानाने दक्षिण धावपट्टीवरून उड्डाण केले होते, मात्र त्याचे लँडिंग उत्तर धावपट्टीवर करण्यात आले. त्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव ही धावपट्टी बंद करण्यात आली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode