
बीड, 16 ऑगस्ट (हिं.स.)।
चौसाळा येथे मंगल कार्यालयाचे बांधकाम करण्याचे कंत्राट घेऊन साहित्य खरेदी आणि मजुरीच्या बहाण्याने तब्बल १४ लाख ७३ हजार १५५ रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी नाशिक येथील एका इसमाविरुद्ध नेकनूर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
नाईक वस्ती चौसाळा येथील रहिवासी लक्ष्मण रामराव कवडे वय ७० वर्षे हे आपल्या जागेवर मंगल कार्यालयाचे बांधकाम करत होते. जानेवारी महिन्यात त्यांच्या शेजाऱ्याने नाशिक येथील अरुण राघो वाघ राहणार अशोक नगर नाशिक शहर याच्याशी त्यांची ओळख करून दिली. वाघ याने स्वतः बांधकाम अभियंता असल्याचे सांगून संपूर्ण साहित्यासह १ कोटी १० लाख रुपयांत कामाचा लेखी करार केला. सुरुवातीला काही साहित्य आणून त्याने बांधकाम सुरू केले आणि फिर्यादीचा विश्वास संपादन केला.
त्यानंतर बांधकाम साहित्य खरेदी करणे आणि नांदेड येथून मजूर आणण्याच्या नावाखाली आरोपीने वेळोवेळी ऑनलाईन माध्यमातून एकूण १४ लाख ७३ हजार १५५ रुपये स्वतःच्या खात्यावर वर्ग करून घेतले. मात्र, पुरवठादारांना पैसे न देता हे पैसे त्याने स्वतःच्या फायद्यासाठी वापरले आणि २२ जुलैपासून बांधकाम पूर्णपणे बंद करून पोबारा केला.
वारंवार विचारणा करूनही काम सुरू न करता फसवणूक केल्याचे निष्पन्न झाल्याने लक्ष्मण कवडे यांच्या फिर्यादीवरून अरुण राघो वाघ याच्याविरुद्ध नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पद्माकर आहेर करत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis