सुखबीर बादल हल्ल्याची एनआयए चौकशी करा; हरसिमरत कौर बादल यांचे अमित शाहांना पत्र
नवी दिल्ली , 16 ऑगस्ट (हिं.स.)।शिरोमणी अकाली दलाच्या खासदार हरसिमरत कौर बादल यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहून माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर झालेल्या हल्ल्याची राष्ट्रीय तपास यंत्रणेमार्फत (एनआयए ) उच्चस्तरीय चौकशी
सुखबीर बादल हल्ल्याची एनआयए चौकशी करा; हरसिमरत कौर बादल यांचे अमित शाहांना पत्र


नवी दिल्ली , 16 ऑगस्ट (हिं.स.)।शिरोमणी अकाली दलाच्या खासदार हरसिमरत कौर बादल यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहून माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर झालेल्या हल्ल्याची राष्ट्रीय तपास यंत्रणेमार्फत (एनआयए ) उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे. हा हल्ला एखाद्या मोठ्या आंतरराज्यीय किंवा आंतरराष्ट्रीय कटाचा भाग असू शकतो, अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली आहे.आपल्या पत्रात त्यांनी १३ ऑगस्ट २०२६ रोजी घडलेल्या ताज्या घटनेचा आणि ४ डिसेंबर २०२४ रोजी अमृतसरमध्ये झालेल्या हल्ल्याचा संभाव्य संबंध तपासण्याची मागणी केली आहे.

हरसिमरत कौर बादल यांनी आपल्या पत्रात ४ डिसेंबर २०२४ रोजी अमृतसरमध्ये घडलेल्या घटनेचा विशेष उल्लेख केला आहे. त्यावेळी श्री हरमंदिर साहिब परिसरात सुखबीर बादल यांच्यावर गोळी झाडण्यात आली होती. त्या वेळी बादल श्री अकाल तख्त साहिबच्या निर्देशानुसार सेवादार म्हणून धार्मिक सेवा बजावत होते.खासदार हरसिमरत कौर यांचे म्हणणे आहे की, दोन्ही हल्ले धार्मिक स्थळांच्या परिसरात आणि अगदी जवळून करण्यात आले आहेत. त्यामुळे या दोन्ही घटनांमागे एकाच प्रकारच्या समाजकंटकांचा किंवा एखाद्या नेटवर्कचा हात असण्याची शक्यता आहे.

पत्रात पंजाब सरकार आणि राज्य पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. हरसिमरत कौर यांचा आरोप आहे की, २०२४ मध्ये झालेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर पंजाब पोलीस मुख्य सूत्रधारांचा शोध घेण्यात आणि संपूर्ण नेटवर्कचा पर्दाफाश करण्यात पूर्णपणे अपयशी ठरले. पहिल्या घटनेतून कोणताही ठोस धडा न घेतल्यामुळेच समाजकंटकांचे मनोबल वाढले आणि दुसऱ्यांदा हल्ला करण्याचे धाडस झाले.अकाली दलाचे म्हणणे आहे की, अशा कटांमागे असलेले मोठे आंतरराज्यीय किंवा सीमापार नेटवर्क उघडकीस आणण्याची क्षमता राज्य पोलिसांकडे नाही.

हरसिमरत कौर यांनी पत्रात स्पष्टपणे म्हटले आहे की, या संपूर्ण प्रकरणाचे सत्य समोर आणण्यासाठी एनआयए चौकशी अत्यंत आवश्यक आहे. दोन्ही हल्ल्यांमधील संभाव्य संबंध, त्यासाठी करण्यात आलेला निधीपुरवठा आणि त्यामागील मुख्य सूत्रधार यांची निष्पक्ष चौकशी केवळ केंद्रीय तपास यंत्रणाच करू शकते. आता या संवेदनशील प्रकरणावर केंद्रीय गृह मंत्रालयाकडून पुढील कोणता निर्णय घेतला जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, १३ ऑगस्ट २०२६ रोजी नांदेड येथील गुरुद्वारा परिसराच्या बाहेर सुखबीर सिंह बादल यांच्यावर अचानक हल्ला करण्यात आला. निहंगांच्या वेशात आलेल्या एका हल्लेखोराने धारदार शस्त्राने त्यांच्यावर वार करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तेथे तैनात असलेल्या स्पेशल प्रोटेक्शन युनिटच्या सुरक्षा कर्मचाऱ्याने प्रसंगावधान राखत स्वतःचा जीव धोक्यात घालून हल्लेखोराला रोखले. या झटापटीत सुखबीर बादल यांच्या उजव्या हाताला दुखापत झाली. सुरक्षा कर्मचाऱ्यालाही दुखापत झाली.

--------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande