बिनागोंड्यात स्वातंत्र्यदिन, पण तिरंगा फडकवण्यास ग्रामस्थ धजावले नाहीत
दहशत झुगारून जनसंघर्ष समितीने फडकवला राष्ट्रध्वज नारायणपूर, 16 ऑगस्ट (हिं.स.) : नक्षलवाद्यांचा कधीकाळी गड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नारायणपूर जिल्ह्यातील अतिदुर्गम बिनागोंडा गावात स्वातंत्र्यदिनाच्या उत्साहावर आजही भीतीचे सावट असल्याचे चित्र समोर आ
बिनागोंडा येथे स्वातंत्र्यदिन साजरा करताना जनसंघर्ष समितीचे कार्यकर्ते


दहशत झुगारून जनसंघर्ष समितीने फडकवला राष्ट्रध्वज

नारायणपूर, 16 ऑगस्ट (हिं.स.) : नक्षलवाद्यांचा कधीकाळी गड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नारायणपूर जिल्ह्यातील अतिदुर्गम बिनागोंडा गावात स्वातंत्र्यदिनाच्या उत्साहावर आजही भीतीचे सावट असल्याचे चित्र समोर आले. शिक्षणाचा दिवा पेटवण्यासाठी आणि तिरंग्याचा सन्मान राखण्यासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या युवा मुनेश नरोटी यांच्या बलिदानभूमीत यंदाही स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला; मात्र नक्षलवाद्यांच्या भीतीमुळे ग्रामस्थांनी तिरंगा फडकवला नाही. केवळ ध्वजस्तंभाचे पूजन करून स्वातंत्र्यदिनाची औपचारिकता पार पडली. ही परिस्थिती अत्यंत वेदनादायी असल्याची भावना जनसंघर्ष समितीने व्यक्त केली.

जनसंघर्ष समितीचे अध्यक्ष दत्ता शिर्के यांनी सहकाऱ्यांसह 15 ऑगस्ट 2026 रोजी बिनागोंडा येथे ग्रामस्थांसोबत स्वातंत्र्यदिन साजरा केला. यावेळी गावातील मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

बिनागोंडा हे गाव काही वर्षांपूर्वी नक्षलवाद्यांच्या दहशतीमुळे शिक्षणापासूनही वंचित झाले होते. गावातील उच्चशिक्षित युवक मुनेश नरोटी यांनी गावातील मुलांच्या भवितव्यासाठी शाळा सुरू करण्याचे धाडसी पाऊल उचलले. नक्षलवाद्यांनी बंद पाडलेली शाळा पुन्हा सुरू करून त्यांनी दुर्गम भागातील मुलांच्या हातात पुस्तके देण्याचा प्रयत्न केला.

मुनेश नरोटी यांनी 15 ऑगस्ट 2025 रोजी शाळेच्या परिसरातील नक्षल स्मारकावर तिरंगा फडकावला होता. त्यानंतर अवघ्या दोन दिवसांनी, 17 ऑगस्ट 2025 रोजी नक्षलवाद्यांनी त्यांची हत्या केली. त्यांच्या हत्येने बिनागोंडा परिसरातील नागरिकांमध्ये पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण झाले.

मात्र, मुनेश नरोटी यांच्या बलिदानानंतरही शिक्षण आणि स्वातंत्र्याची ज्योत विझलेली नाही, हा संदेश देण्यासाठी जनसंघर्ष समितीने यंदा बिनागोंड्यात ग्रामस्थांसोबत स्वातंत्र्यदिन साजरा केला. “ज्या भूमीवर एका तरुणाने शिक्षणासाठी आणि तिरंग्यासाठी आपले प्राण दिले, त्या भूमीवर तिरंगा सदैव अभिमानाने फडकला पाहिजे. नक्षलवादाच्या भीतीवर स्वातंत्र्याचा आणि शिक्षणाचा विजय झाला पाहिजे,” असे जनसंघर्ष समितीचे अध्यक्ष दत्ता शिर्के यांनी सांगितले.

विकासाच्या अभावाचे आव्हान कायम

बिनागोंडा हे अत्यंत दुर्गम भागात असल्याने आजही गावाला मुख्य प्रवाहाशी जोडणाऱ्या मूलभूत सुविधांचा अभाव आहे. गावापर्यंत जाण्यासाठी योग्य रस्त्याची सुविधा नाही, नियमित वाहतूक उपलब्ध नाही. त्यामुळे ग्रामस्थांना शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि इतर मूलभूत गरजांसाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. विकासाचा अभाव आणि सुरक्षेची चिंता यामुळे नक्षलवादाचे सावट पूर्णपणे दूर करण्याचे आव्हान अद्याप कायम आहे.

जनसंघर्ष समितीने सरकारकडे बिनागोंडा आणि परिसरातील गावांना तातडीने मुख्य प्रवाहाशी जोडण्याची मागणी केली आहे. पक्के रस्ते, नियमित वाहतूक, शिक्षण, आरोग्य, वीज आणि इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच नागरिकांच्या मनातील नक्षलवादाची भीती दूर करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी समितीने केली.

मुनेश नरोटी यांचे बलिदान व्यर्थ जाऊ नये. त्यांच्या गावातील प्रत्येक मुलाच्या हातात पुस्तक आणि प्रत्येक घरावर अभिमानाने तिरंगा फडकावा, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, अशी भावना जनसंघर्ष समितीने व्यक्त केली.

यावेळी जनसंघर्ष समिती, नागपूरचे अभिषेक सावरकर, विशाल निरगुडे आणि रोहित मौंदेकर यांच्यासह समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांच्या सहभागातून स्वातंत्र्य, शिक्षण आणि विकासाचा संदेश देण्यात आला.

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande