
ढाका, 16 ऑगस्ट (हिं.स.)।बांगलादेशने पंतप्रधान तारिक रहमान यांच्या संभाव्य भारत दौऱ्याचा मुद्दा पुन्हा एकदा शेख हसीना आणि इतर फरार आरोपींच्या प्रत्यार्पणाशी जोडला आहे. त्यामुळे पुढील महिन्यात होणाऱ्या ब्रिक्स शिखर परिषदपूर्वी पंतप्रधान रहमान यांचा भारत दौरा होण्याची शक्यता आता धूसर झाली आहे.
बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी रविवारी सांगितले की, दोन्ही देशांचे अधिकारी गेल्या काही आठवड्यांपासून पंतप्रधान तारिक रहमान यांच्या द्विपक्षीय भारत दौऱ्याच्या शक्यतेवर चर्चा करत होते. मात्र, ५ ऑगस्ट रोजी शेख हसीना यांनी घेतलेल्या खुल्या पत्रकार परिषदेमुळे ही प्रक्रिया विस्कळीत झाली.प्रवक्त्यांनी सांगितले, “आम्ही या मुद्द्यावर आमची भूमिका स्पष्ट केली आहे. या दौऱ्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण करणे आवश्यक आहे. त्यासाठी आम्ही भारतीय अधिकाऱ्यांकडे शेख हसीना आणि इतर फरार आरोपींचे प्रत्यार्पण तसेच हादी यांच्या हत्येतील आरोपी मारेकऱ्यांना बांगलादेशच्या ताब्यात देण्याची मागणी केली आहे. आम्ही भारताच्या उत्तराची प्रतीक्षा करत आहोत.”
त्यांनी पुढे सांगितले की, रहमान सरकार ‘बांगलादेश फर्स्ट’ या धोरणानुसार सार्वभौमत्व, समानता, राष्ट्रीय प्रतिष्ठा, एकमेकांच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप न करणे आणि परस्पर हित या तत्त्वांच्या आधारे शेजारी देशांसह इतर देशांशी मैत्रीपूर्ण संबंध पुढे नेणार आहे.विशेष म्हणजे, भारताने पंतप्रधान तारिक रहमान यांना ब्रिक्स शिखर परिषदेत अतिरिक्त सहयोगी देशाचे प्रमुख म्हणून सहभागी होण्याचे निमंत्रण दिले होते.
मात्र, ढाका येथील भारतीय उच्चायुक्त दिनेश त्रिवेदी यांना बांगलादेश सरकारकडून सांगण्यात आले की, कोणत्याही परिषदेत सहभागी होण्याऐवजी पंतप्रधान रहमान यांना स्वतंत्रपणे द्विपक्षीय भारत दौरा करायचा आहे. मात्र, बांगलादेश सरकार हा दौरा शेख हसीना यांच्या प्रत्यार्पणाशी जोडत असल्याने अडचण निर्माण झाली आहे.
शेख हसीना ऑगस्ट २०२४ मध्ये सत्तेतून पायउतार झाल्यानंतर भारतात राहत आहेत. बांगलादेशातील एका न्यायाधिकरणाने त्यांना मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवले आहे.दरम्यान, ५ ऑगस्ट २०२६ रोजी शेख हसीना यांनी पत्रकार परिषदेत डिसेंबर २०२६ मध्ये ढाक्यात परतणार असल्याचे सांगितले होते. तसेच बांगलादेशातील लोकशाहीचे रक्षण करण्याचा निर्धार व्यक्त केला होता. माजी पंतप्रधान हसीना यांनी रहमान सरकार तसेच त्याआधीच्या अंतरिम सरकारचे प्रमुख प्रा. मोहम्मद युनूस यांच्यावर अनेक आरोप केले होते. आता बांगलादेशचे म्हणणे आहे की, शेख हसीना यांच्या या वक्तव्यांमुळे तारिक रहमान यांच्या भारत दौऱ्याची प्रक्रिया प्रभावित झाली आहे.
दरम्यान, पंतप्रधान तारिक रहमान यांनी यापूर्वीच चीनचा दौरा केला असून, या दौऱ्यात दोन्ही देशांमध्ये अनेक करार करण्यात आले आहेत. यातील काही करारांबाबत भारत फारसा समाधानी नसल्याचे मानले जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode