
इस्लामाबाद, 16 ऑगस्ट (हिं.स.)।पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष आसिफ अली झरदारी यांनी आपल्या देशातील हिंदू लोकसंख्येबाबत केलेल्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. ‘मिस्टर 10 टक्के’ या नावाने ओळखले जाणारे झरदारी यांनी वादग्रस्त वक्तव्य करत पाकिस्तानात 4 टक्के हिंदूंना सहन केले जात असल्याचे म्हटले आहे. पाकिस्तानमधील लोकांची मानसिकता हिंदूंना सहन करण्याची असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, हिंदू भारतात जाण्याऐवजी पाकिस्तानातच राहणे पसंत करतील, असा दावाही त्यांनी केला.
14 ऑगस्ट रोजी बोलताना झरदारी म्हणाले, “भारतीयांचा दृष्टिकोन वेगळा आहे. त्यांच्या मनात स्वतःचा अजेंडा आहे. भारतीय अखंड भारतावर विश्वास ठेवतात, मात्र आम्ही मुस्लिम आहोत आणि ते तसे नाहीत. तरीही आमची विचारसरणी अशी आहे की, आम्ही इतरांना सहन करतो. पाकिस्तानात 4 टक्के हिंदू लोकसंख्या आहे. ते इतर कुठल्याही ठिकाणाप्रमाणेच स्वतंत्र आहेत. ते भारताऐवजी आमच्यासोबत राहणे अधिक पसंत करतील.”
मात्र, पाकिस्तानातील हिंदू लोकसंख्या 4 टक्के असल्याचा झरदारींचा दावा देशातील अलीकडील जनगणनेच्या आकडेवारीशी विसंगत आहे. पाकिस्तानच्या 2023 च्या जनगणनेनुसार, देशात सुमारे 52 लाख हिंदू आहेत. ही संख्या पाकिस्तानच्या एकूण लोकसंख्येच्या केवळ 2.17 टक्के आहे. हा आकडा झरदारी यांनी नुकत्याच केलेल्या दाव्यापेक्षा बराच कमी आहे.
पाकिस्तानमध्ये वाढत्या राजकीय अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर झरदारी यांचे हे ताजे वक्तव्य समोर आले आहे. देशाच्या सत्तेवर आसिम मुनीर यांचा प्रभाव वाढत असल्याचे बोलले जात आहे. वृत्तांनुसार, पाकिस्तानचे माजी लष्करी अधिकारी आदिल राजा यांनी देशातील सध्याची राजकीय व्यवस्था बदलण्याच्या योजनेवर विचार सुरू असल्याचा दावा केला आहे. या संभाव्य बदलानुसार आसिम मुनीर राष्ट्राध्यक्ष, तर मोहसिन नक्वी पंतप्रधान होण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, झरदारी यांनी हे वक्तव्य ज्या कार्यक्रमात केले, तो इस्लामाबादमधील यादगार-ए-फतह येथे आयोजित करण्यात आला होता. 2025 मध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या संघर्षाला पाकिस्तानने ‘मरका-ए-हक’ असे नाव दिले आहे. या कथित विजयाच्या स्मरणार्थ हे स्मारक उभारण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode