लातूर - गुटखा वाहतूक करणाऱ्या टाटा एसवर पोलिसांचा छापा; ११ लाखांचा माल जप्त
लातूर, 16 ऑगस्ट (हिं.स.)। शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची अवैध वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध शिरूर अनंतपाळ पोलिसांनी धडक कारवाई केली. प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक अक्षय जाधव यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या कारवाईत वि
पोलीस कारवाई


लातूर, 16 ऑगस्ट (हिं.स.)।

शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची अवैध वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध शिरूर अनंतपाळ पोलिसांनी धडक कारवाई केली. प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक अक्षय जाधव यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या कारवाईत विविध कंपन्यांचा प्रतिबंधित पान मसाला व तंबाखूजन्य पदार्थ तसेच वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला टाटा एस असा एकूण ११ लाख ३ हजार ६४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

दि. १६ ऑगस्ट रोजी सकाळी सुमारे ७ वाजता मौजे आरीमोड येथील नळेगावकडे जाणाऱ्या रस्त्यावर पोलिसांनी संशयास्पद वाहनाची तपासणी केली. यावेळी शेख खामरोद्दीन बशीर (वय २९, रा. रेणापूर, जि. लातूर) याच्या ताब्यातील बदामी रंगाचा टाटा एस क्रमांक एमएच-१३-सीजे-०५३६ या वाहनामध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ आढळून आले.

पोलिसांनी केलेल्या कारवाईत विमल पान मसाला, व्ही-१ तंबाखू, रजनीगंधा सुगंधित पान मसाला आणि प्रिमियम रत्ना ब्रँड तंबाखू असा एकूण ८ लाख ८८ हजार ६४० रुपयांचा प्रतिबंधित माल जप्त केला. तसेच वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला २ लाख १५ हजार रुपये किमतीचा टाटा एस असा एकूण ११ लाख ३ हजार ६४० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला.

या प्रकरणी शिरूर अनंतपाळ पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १८९/२०२६ नुसार भारतीय न्याय संहितेतील कलम १२३, २२३, २७४, २७५ तसेच अन्नसुरक्षा व मानके अधिनियम २००६ मधील कलम ५९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रशिक्षणाचा भाग म्हणून पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक अक्षय जाधव यांच्याकडे शिरूर अनंतपाळ पोलीस ठाण्याचा तीन महिन्यांचा कार्यभार सोपविला आहे. त्यांनी १३ ऑगस्ट २०२६ पासून पोलीस ठाण्याचा कार्यभार स्वीकारला आहे. पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचा प्रशिक्षण कालावधी सुरू आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रायबोळे करीत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande