
नवी दिल्ली, 16 ऑगस्ट (हिं.स.)। केंद्रीय संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘दिमागी नक्षल’ या शब्दाच्या केलेल्या वापराबाबत रविवारी स्पष्टीकरण दिले. त्यांनी सांगितले की, पंतप्रधानांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांना ‘दिमागी नक्षल’ म्हटलेले नाही, तर हा शब्द माओवादी, फुटीरतावादी आणि भारताचे विभाजन करण्याची विचारसरणी असलेल्या लोकांसाठी वापरण्यात आला आहे.
रिजिजू यांनी सोशल मीडिया मंच एक्सवरील एका पोस्टद्वारे पंतप्रधानांच्या वक्तव्याचा अर्थ स्पष्ट केला. त्यांनी सांगितले की, माओवादाचे समर्थन करणारे, भारतीय संविधान नाकारणारे, फुटीरतावाद्यांच्या बाजूने उभे राहणारे आणि कलम ३७० चे समर्थन करणारे लोक, तसेच ईशान्य भारताला देशाच्या उर्वरित भागापासून वेगळे करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना ‘दिमागी नक्षल’ म्हटले गेले आहे. आपल्या पोस्टसोबत रिजिजू यांनी शरजील इमाम यांच्या एका जुन्या वक्तव्याचाही हवाला दिला, ज्यामध्ये ईशान्य भारताला देशापासून वेगळे करण्याबाबत बोलण्यात आले होते.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून देशाला संबोधित करताना ‘दिमागी नक्षल’ या शब्दाचा वापर केला होता. अशा लोकांना अलग ठेवण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले होते. यानंतर विरोधी पक्षांनी दावा केला होता की, पंतप्रधानांचा इशारा सरकारच्या धोरणांचा विरोध करणाऱ्या विरोधी पक्ष आणि नेत्यांकडे होता.
रिजिजू यांनी हे आरोप फेटाळून लावत सांगितले की, पंतप्रधानांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांना ‘दिमागी नक्षल’ म्हटलेले नाही. त्यांनी स्पष्ट केले की, हा शब्द माओवादी विचारसरणीचे समर्थन करणाऱ्या, संविधान नाकारणाऱ्या किंवा देशाच्या एकता आणि अखंडतेविरोधात फुटीरतावादी विचार बाळगणाऱ्या लोकांसाठी वापरण्यात आला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule