
बीड, 16 ऑगस्ट (हिं.स.)।
दारूच्या नशेत होणारी मारहाण आणि संशयावरून सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या सततच्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून एका ३२ वर्षीय विवाहितेने धावत्या दुचाकीवरून उडी मारून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या प्रकरणी मयत विवाहितेच्या पतीसह सासरच्या पाच जणांविरुद्ध नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धोतरा वस्ती चौसाळा येथील रहिवासी कलाबाई रमेश पवार यांचा विवाह १७ वर्षांपूर्वी रमेश पवार याच्यासोबत झाला होता. लग्नानंतर संशयावरून तसेच घरगुती कारणांवरून पती, सासू, सासरे व इतर नातेवाईक तिला सातत्याने मारहाण व शिवीगाळ करत असत. पतीने दारूच्या नशेत वाद घालत जेवण बनवण्यावरून वाद उकरून काढला आणि घरातील सर्वांनी मिळून कलाबाई यांना बेदम मारहाण केली. या सततच्या त्रासाला कंटाळून मांजरसुंबा चौक परिसरातून पतीसोबत दुचाकीवर जात असताना कलाबाई यांनी धावत्या दुचाकीवरून खाली उडी मारली.
या घटनेत डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी मयत महिलेचा भाऊ संतराम भास्कर शिंदे वय ३९ वर्षे राहणार शिंदोड यांच्या फिर्यादीवरून पती रमेश चंदू पवार, सासरा चंदू शिवराम पवार, सासू ताराबाई चंदू पवार, दीर सतीष चंदू पवार आणि जाऊ वर्षा सतीष पवार सर्व राहणार धोतरा वस्ती चौसाळा यांच्याविरुद्ध नेकनूर पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नितीन काकरवाल करत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis