युक्रेनचा रशियावर आतापर्यंतचा सर्वात मोठा ड्रोन हल्ला; सहा जणांचा मृत्यू
मॉस्को, 16 ऑगस्ट (हिं.स.)।युक्रेनने रशियावर आतापर्यंतचा सर्वात मोठा आणि भीषण हवाई हल्ला केला आहे. रविवारी रात्री झालेल्या या हल्ल्यामुळे संपूर्ण रशियात खळबळ उडाली. युक्रेनच्या ड्रोनने रशियाची राजधानी मॉस्कोपासून रोस्तोव्हपर्यंत मोठी हानी केली आहे.
युक्रेनचा रशियावर आतापर्यंतचा सर्वात मोठा ड्रोन हल्ला; सहा जणांचा मृत्यू


मॉस्को, 16 ऑगस्ट (हिं.स.)।युक्रेनने रशियावर आतापर्यंतचा सर्वात मोठा आणि भीषण हवाई हल्ला केला आहे. रविवारी रात्री झालेल्या या हल्ल्यामुळे संपूर्ण रशियात खळबळ उडाली. युक्रेनच्या ड्रोनने रशियाची राजधानी मॉस्कोपासून रोस्तोव्हपर्यंत मोठी हानी केली आहे. रशियाच्या संरक्षण मंत्रालयाच्या माहितीनुसार, रात्रीभरात युक्रेनचे तब्बल ८२२ ड्रोन पाडण्यात आले. या भीषण हल्ल्यात रशियात किमान सहा जणांचा मृत्यू झाला आहे.

मॉस्कोचे महापौर सर्गेई सोब्यानिन यांनी सांगितले की, सुमारे ६०० ड्रोन थेट राजधानी मॉस्कोच्या दिशेने येत होते. त्यापैकी सुमारे एकतृतीयांश ड्रोन मॉस्को प्रदेशाच्या हद्दीतच हवेत नष्ट करण्यात आले. मॉस्को प्रदेशाचे गव्हर्नर आंद्रेई वोरोब्योव्ह यांच्या माहितीनुसार, एका ड्रोनने थेट एका निवासी इमारतीला धडक दिली. या दुर्घटनेत ८३ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. या हल्ल्यामुळे पोडॉल्स्क शहरातील ई-कॉमर्स कंपनी वाइल्डबेरीजच्या मोठ्या गोदामांमध्ये भीषण आग लागली. आगीमुळे परिसरात काळ्या धुराचे मोठे लोट पसरले.

दुसरीकडे, रोस्तोव्ह प्रदेशातही मोठी दहशत निर्माण झाली. गव्हर्नर युरी स्ल्यूसर यांनी सांगितले की, रोस्तोव्हमधील तीन शहरांवर १५० हून अधिक ड्रोनने हल्ला केला. या हल्ल्यात पाच जणांचा मृत्यू झाला. अनेक निवासी इमारती, एक रेल्वे स्थानक आणि आसपासची जंगले आगीच्या भक्ष्यस्थानी पडली.

दरम्यान, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी सांगितले की, रशियानेही क्षेपणास्त्रे आणि ड्रोनच्या माध्यमातून युक्रेनवर हल्ले केले. क्रिव्ही रिह शहरात रशियन क्षेपणास्त्र कोसळल्याने दोन जणांचा मृत्यू झाला, तर १४ जण जखमी झाले. सुमी शहरात एका व्यक्तीचा मृत्यू झाला.

राजधानी कीवमध्येही अनेक ठिकाणी आग लागली असून, या घटनांमध्ये सहा जण भाजले आहेत. झेलेन्स्की यांनी आरोप केला की, रशिया बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांच्या माध्यमातून नागरी ठिकाणांना जाणीवपूर्वक लक्ष्य करत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande