
नवी दिल्ली , 16 ऑगस्ट (हिं.स.)।
देशाचे माजी पंतप्रधान आणि भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या आठव्या पुण्यतिथीनिमित्त देशभरातून त्यांना आदरांजली वाहण्यात येत आहे. दिल्लीतील त्यांच्या समाधीस्थळ ‘सदैव अटल’ येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोहोचून अटलजींना श्रद्धांजली अर्पण केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत अटलजींच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांचे स्मरण केले. भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांना आदरांजली वाहताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, अद्भुत दूरदृष्टी असलेले असाधारण राजकारणी म्हणून अटलजींनी आपले संपूर्ण जीवन देशसेवेसाठी समर्पित केले. त्यांच्या विचारांनी आणि प्रयत्नांनी अनेक पिढ्यांना प्रेरणा दिली, तर त्यांच्या नेतृत्वामुळे देश अधिक मजबूत झाला. सुशासन आणि जनकल्याणावर त्यांनी दिलेला भर कायमच आपल्याला मार्गदर्शन करत राहील.
देशाचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या स्मारकस्थळी ‘सदैव अटल’ येथे पुष्पांजली अर्पण केली. याशिवाय भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनीही वाजपेयी यांच्या पुण्यतिथीनिमित्त ‘सदैव अटल’ येथे पोहोचून त्यांना श्रद्धांजली वाहिली.
अटल बिहारी वाजपेयी यांनी आपल्या राजकीय कौशल्यासोबतच संवेदनशील व्यक्तिमत्त्वाच्या जोरावर भारतीय राजकारणात वेगळी ओळख निर्माण केली. ते तीन वेळा देशाचे पंतप्रधान राहिले. त्यांचा पहिला कार्यकाळ १९९६ मध्ये केवळ १३ दिवसांचा होता. त्यानंतर १९९८-९९ मध्ये त्यांनी पुन्हा पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली. पुढे १९९९ ते २००४ या कालावधीत त्यांनी देशाचे पंतप्रधान म्हणून कार्यभार सांभाळला.
अटल बिहारी वाजपेयी यांची प्रखर वक्ते आणि संवेदनशील कवी म्हणूनही आठवण केली जाते. त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने पोखरण येथे अणुचाचण्या केल्या. त्यांच्या सरकारच्या काळात स्वर्णिम चतुर्भुज प्रकल्पासारख्या महत्त्वपूर्ण योजनांना मोठी चालना मिळाली. अटल बिहारी वाजपेयी यांना २०१५ मध्ये देशाच्या सर्वोच्च नागरी सन्मान ‘भारतरत्न’ने सन्मानित करण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode