वाराणसी विमानतळावर शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाच्या पिस्तुलातून गोळीबार; दोघे जखमी
लखनऊ, 16 ऑगस्ट (हिं.स.)। वाराणसी विमानतळावर शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक कमलेश केदारनाथ राय यांच्या परवानाधारक पिस्तुलातून दोन राउंड फायर झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत सुदैवाने गोळी थेट कोणाला लागण्याऐवजी भिंतीवर किंवा दुसऱ्या दिशे
Varanasi Airport Firing Incident Passenger Pistol Accident


लखनऊ, 16 ऑगस्ट (हिं.स.)। वाराणसी विमानतळावर शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक कमलेश केदारनाथ राय यांच्या परवानाधारक पिस्तुलातून दोन राउंड फायर झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत सुदैवाने गोळी थेट कोणाला लागण्याऐवजी भिंतीवर किंवा दुसऱ्या दिशेने आदळून परतल्याने जवळच असलेल्या दोन कर्मचाऱ्यांना तिचा फटका बसला. या घटनेतविमानतळावरील सुरक्षा तपासणी कर्मचाऱ्यांपैकी रोहित राज आणि सुमन कुमारी हे दोघे जखमी झाले आहेत. दोघांनाही तातडीने न्यू लक्ष्मी ट्रॉमा सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कमलेश राय हे पत्नीसमवेत वाराणसीहून मुंबईला जाण्यासाठी विमानतळावर पोहोचले होते. ते एअर इंडिया एक्स्प्रेसच्या आयएक्स १८१० या विमानाने मुंबईला जाणार होते. सकाळी साडेनऊच्या सुमारास विमानतळावरील शस्त्र तपासणी दरम्यान पिस्तुल लॉक करत असताना अचानक दोन गोळ्या सुटल्या. या गोळीबारामुळे विमानतळ परिसरात काही काळ गोंधळाचे आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले.

कमलेश राय यांच्याकडे ७.६२ मिलिमीटरचे पिस्तुल असल्याची माहिती समोर आली आहे. या पिस्तुलासोबत २१ जिवंत काडतुसेही आढळून आल्याचे सांगण्यात येत आहे. गोळीबाराची घटना घडल्यानंतर विमानतळावरील सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तातडीने राय यांना ताब्यात घेतले. त्यानंतर स्थानिक पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली असून पोलिसांकडून त्यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे.

या प्रकरणाची विमानतळ सुरक्षा तसेच बीसीएएस अर्थात ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटीच्या माध्यमातून सखोल चौकशी केली जात आहे. शस्त्र विमानतळावर आणताना आणि तपासणीदरम्यान हाताळताना निर्धारित सुरक्षा नियमांचे पालन करण्यात आले होते का, याचीही तपासणी केली जाणार आहे. पिस्तुलातून नेमके कोणत्या परिस्थितीत गोळीबार झाला, याचा तपास सुरू आहे.

दरम्यान, घटनेनंतर विमानतळावरील सुरक्षा व्यवस्था अधिक सतर्क करण्यात आली. काही काळ प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण होते. मात्र परिस्थिती तातडीने नियंत्रणात आणण्यात आली असून विमानतळाचे नियमित कामकाज सुरळीत सुरू असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. चौकशी पूर्ण झाल्यानंतर या प्रकरणात दोष आणि निष्काळजीपणा आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार योग्य कारवाई केली जाणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande