
नवी दिल्ली, 17 ऑगस्ट (हिं.स.) : भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी पक्ष सोडण्याचा अंतिम निर्णय घेतला आहे. त्यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांना पत्र लिहून राष्ट्रीय प्रवक्तेपद तसेच पक्षाच्या सक्रिय प्राथमिक सदस्यत्वातून मुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. आर्थिक आणि वैयक्तिक परिस्थितीमुळे हा निर्णय घेतल्याचे पूनावाला यांनी स्पष्ट केले आहे.
मात्र, पक्षाच्या संघटनात्मक व्यवस्थेतून बाहेर पडत असले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच भाजपची विचारधारा आणि कार्यांप्रती आपले समर्थन कायम राहील, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. “मी पक्षाची व्यवस्था सोडत आहे, परंतु विचार आणि व्यक्ती नाही,” हे त्यांचे वक्तव्य या संपूर्ण घडामोडीतील महत्त्वाचा संदेश मानला जात आहे. पूनावाला यांनी आपल्या पत्रात 30 जुलै 2026 रोजी लिहिलेल्या पहिल्या पत्राचा संदर्भ दिला आहे. त्या पत्रात त्यांनी आर्थिक आणि वैयक्तिक परिस्थितीचा उल्लेख करत भाजपमधील सर्व पदे आणि प्राथमिक सदस्यत्वाचा कोणतीही अट न ठेवता राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली होती. पूनावाला यांनी सांगितले की, पक्षाने त्यांचा राजीनामा तत्काळ स्वीकारण्यास नकार देत त्यांना निर्णयाचा पुनर्विचार करण्याची विनंती केली होती. हा त्यांच्यासाठी भावनिक क्षण होता. मात्र, त्यानंतर झालेल्या दीर्घ चर्चेनंतर आणि गंभीर विचारविनिमयानंतर त्यांनी आपल्या निर्णयावर ठाम राहण्याचा अंतिम निर्णय घेतला.
भाजप अध्यक्ष नितीन नबीन यांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात पूनावाला यांनी मागील काही दिवसांतील घटनांचाही उल्लेख केला आहे. पक्ष नेतृत्वाला त्यांनी यापूर्वी सविस्तर माहिती दिलेल्या काही व्यक्तींशी संबंधित परिस्थिती आणि अलीकडील घडामोडींमुळे आपल्या पूर्वीच्या निर्णयावर ठाम राहण्याची वेळ आल्याचे त्यांनी म्हटले आहे. या पत्रातून पूनावाला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष नितीन नबीन, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि संघटन महामंत्री बी. एल. संतोष यांचे आभार मानले आहेत. या वरिष्ठ नेत्यांविषयी आपल्या मनात कोणतीही नाराजी किंवा दुखावल्याची भावना नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.गेल्या 5 वर्षांत पक्षाने आपल्याला दिलेल्या व्यासपीठासाठी आणि विविध संधींसाठी त्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाचे आभार मानले. तसेच, अत्यावश्यक आर्थिक आणि वैयक्तिक परिस्थितीमुळे आता आपण खासगी क्षेत्रात प्रवेश करणार असल्याचे पूनावाला यांनी सांगितले.
दरम्यान, भविष्यात जिथे आणि ज्या स्वरूपात शक्य असेल, तिथे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच भाजपच्या दृष्टिकोन आणि कार्यांना आपले समर्थन सुरूच राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.आपला निर्णय स्पष्ट करताना पूनावाला म्हणाले की, मी पक्षाची व्यवस्था सोडत आहे, परंतु विचार आणि व्यक्ती नाही.पक्षाच्या संघटनात्मक व्यवस्थेतून बाहेर पडत असतानाही विचारधारा आणि नेतृत्वाप्रती समर्थन कायम ठेवण्याचा संदेश देत त्यांनी पक्ष नेतृत्व आणि संघटनेप्रती कृतज्ञता व्यक्त करत पत्राचा समारोप केला.
---------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी