
पाटणा, 17 ऑगस्ट (हिं.स.)। बिहारमधील लखीसराय जिल्ह्यातील अशोकधाम शिव मंदिरात श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी आज झालेल्या चेंगराचेंगरीत सात भाविकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. प्रशासनाने अद्याप निश्चित आकडा जाहीर केलेला नाही. जिल्हाधिकारी शैलेंद्र कुमार यांनी माध्यमांना सुमारे सात भाविकांचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली आहे. त्यांनी सांगितले की, अनेक भाविक जखमी झाले आहेत. मृतांमध्ये सर्व महिला असल्याचे सांगण्यात आले आहे.
सुमारे 55 हजार भाविक जलाभिषेक करण्यासाठी येथे पोहोचले होते, असे सांगण्यात आले आहे. याचदरम्यान चेंगराचेंगरी झाली. भाविक इकडे-तिकडे पळू लागले. यावेळी अनेक भाविक एकमेकांच्या खाली दबले गेले. प्रशासनाचे पथक बचावकार्य राबवत आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
आतापर्यंत ज्या मृतांची ओळख पटली आहे, त्यामध्ये मधुबाला देवी (पती निरंजन कुमार सिंह, बडहिया), मनमाला देवी (पती निरंजन कुमार, बडहिया), रिंकू देवी (पती नीरज यादव, सफिया सराय मुंगेर), हेमलता देवी (पती सुरेंद्र यादव, प्रतापपूर, हलसी, लखीसराय) यांचा समावेश आहे.
जखमींमध्ये सात महिलांचा समावेश आहे. त्यामध्ये मौसम कुमारी (वडील ललन राम, लक्ष्मीपूर), मुस्कान कुमारी (ललन राम, विद्यापीठ चौक), ममता देवी (पती धारो यादव, चननिया, लखीसराय), विमला देवी (पती विनोद राम, मोकामा), रीना कुमारी (पती राजेश सिंह, बभंगामा, लखीसराय), शिवानी कुमारी (वडील रामेश्वर राम, फरीदाबाद, लखीसराय), कबीला देवी (बाढ) यांचा समावेश आहे.
मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी दुःख व्यक्त करताना म्हटले की, लखीसरायच्या अशोकधाम येथील घटना अत्यंत दुःखद आणि हृदयद्रावक आहे. भाविकांच्या मृत्यूची बातमी ऐकून मन व्यथित झाले आहे. शोकाकुल कुटुंबीयांप्रती माझ्या मनःपूर्वक संवेदना आहेत. त्यांनी सांगितले की, जखमींवर योग्य आणि तातडीने उपचार करण्यासाठी प्रशासनाला आवश्यक निर्देश देण्यात आले आहेत. ईश्वर दिवंगत आत्म्यांना शांती आणि जखमींना लवकर आरोग्य लाभ देवो.
जिल्हाधिकारी शैलेंद्र कुमार यांनी सांगितले की, सकाळी 6:30 वाजता ही घटना घडली. अशोक धाम स्थानकापासून मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर ही घटना घडली. येथे रात्री विजेचा खांब पडला होता. 17 ऑगस्टच्या सकाळी मंदिरात जलाभिषेक करण्यासाठी भाविक पोहोचले असता, कोणीतरी विजेच्या खांबामध्ये वीजप्रवाह असल्याची अफवा पसरवली. त्यामुळे चेंगराचेंगरी झाली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule