
रांची, 17 ऑगस्ट (हिं.स.) : झारखंडमधील स्पर्धात्मक परीक्षांमधील गैरप्रकार आणि घोटाळ्यांचे प्रकरण दिवसेंदिवस गंभीर होत चालले आहे. झारखंड लोकसेवा आयोगाच्या (जेपीएससी) मेधा घोटाळ्यानंतर आता झारखंड कर्मचारी निवड आयोगाच्या (जेएसएससी) सीजीएल परीक्षेतील अनियमितता आणि पेपर लीक प्रकरणात सीआयडीने मोठी कारवाई सुरू केली आहे.
जेएसएससी सीजीएल परीक्षा प्रकरणात पुरावे गोळा करण्यासाठी सीआयडीच्या पथकांकडून तपास वेगाने सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सीआयडीचे एक पथक नामकुम येथील जेएसएससीच्या मुख्य कार्यालयात दाखल झाले असून तेथे सखोल छापेमारी सुरू आहे. त्याचवेळी दुसरे पथक आयोगाचे सचिव सुधीर गुप्ता यांची चौकशी करत आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नुकत्याच झालेल्या जेपीएससी मेधा घोटाळ्याच्या तपासादरम्यान अटक करण्यात आलेल्या आरोपींची चौकशी करण्यात आली होती. या चौकशीत जेएसएससी सीजीएल परीक्षेतील कथित पेपर लीक तसेच पैशांच्या व्यवहारासंदर्भात काही महत्त्वाचे खुलासे झाल्याचे समोर आले आहे.
या पूर्वी मिळालेल्या माहितीच्या आधारे आणि तपासादरम्यान हाती लागलेल्या पुराव्यांच्या आधारे सीआयडी आता जेएसएससी सीजीएल परीक्षा प्रकरणात ठोस पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून जेएसएससी कार्यालयात ही छापेमारी करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे.
या कारवाईमुळे झारखंडमधील स्पर्धा परीक्षांमधील कथित गैरप्रकारांचा तपास आणखी व्यापक होण्याची शक्यता आहे.---------------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी