
मुंबई, 17 ऑगस्ट (हिं.स.)। देशभरातील रेल्वे स्थानकांवरील प्रवाशांच्या मूलभूत सुविधांचा अभाव आणि पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेबाबत गंभीर बाबी भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक अर्थात कॅगच्या अहवालातून समोर आल्या आहेत. देशातील विविध रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलरच्या पाण्याच्या तपासणीत काही ठिकाणी ई-कोलाय आणि टोटल कोलिफॉर्म्स हे जिवाणू आढळून आल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, भिवंडी रोड, कल्याण आणि लोणावळा या चार स्थानकांचाही यामध्ये समावेश आहे. दक्षिण रेल्वेतील कोईम्बतूर आणि पालक्कड जंक्शन, दक्षिण मध्य रेल्वेतील हैदराबाद या स्थानकांवरील नमुन्यांमध्येही ई-कोलाय विषाणूचे प्रमाण दिसून आले.
नियंत्रक व महालेखापरीक्षक अर्थात कॅगच्या तपासणीत मुंबईसह देशातील ८ रेल्वे स्थानकांवरील पाण्याच्या नमुन्यांमध्ये ई-कोलायसह कोलिफॉर्म जीवाणू आढळले. स्थानकांवरील स्वच्छतागृहांची स्थितीही समाधानकारक नसल्याचे समोर आले. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, हावडा, सियालदह, नवी दिल्ली आणि मुंबई सेंट्रल यांसारख्या प्रथम श्रेणीतील स्थानकांवरही मूलभूत सुविधांमध्ये त्रुटी आढळल्या. येथे आसनव्यवस्था, स्वच्छताविषयक सुविधा, कचरापेट्या व इलेक्ट्रॉनिक रेल्वे सूचना फलक यांसह काही सुविधांची कमतरता आढळल्या.
रेल्वेच्या नियमानुसार स्थानकांवरील पाणीपुरवठा यंत्रणेची वर्षातून किमान दोन वेळा तपासणी होणे अपेक्षित आहे. मात्र, कॅगच्या पाहणीत १५ रेल्वे झोनमधील ४३६ स्थानकांवर पाण्याची तपासणी करण्यासाठी आवश्यक टेस्ट किट उपलब्ध नसल्याचे आढळले. यामध्ये मध्य रेल्वेच्या २८ स्थानकांचा समावेश आहे. त्यामुळे प्रवाशांना पुरवण्यात येणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
कॅगने तपासलेल्या ५१२ स्थानकांपैकी तब्बल ४५८ स्थानकांवर एक किंवा त्यापेक्षा अधिक मूलभूत प्रवासी सुविधांची कमतरता आढळली. पंखे, वॉटर कूलर, पिण्याच्या पाण्याचे नळ, स्वच्छतागृहे, युरिनल्स, आसन व्यवस्था, प्लॅटफॉर्म शेड आणि प्रतीक्षालय यांसारख्या सुविधांमध्ये त्रुटी असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. तपासलेल्या स्थानकांमध्ये पंख्यांची ४२ टक्के, वॉटर कूलरची ४० टक्के आणि पिण्याच्या पाण्याच्या नळांची २७ टक्के कमतरता आढळली. तसेच २१ स्थानकांवर आवश्यक प्रतीक्षालयच उपलब्ध नसल्याचे समोर आले.
पाण्यातील ई-कोलायच्या काही प्रकारांमुळे अतिसार, पोटदुखी, उलट्या, मळमळ आणि पोटात कळा येऊ शकतात. गंभीर संसर्ग झाल्यास रक्तमिश्रित जुलाब, ताप, शरीरातील पाण्याची कमतरता आणि काही प्रकरणांमध्ये मूत्रपिंडांवर परिणाम होण्याचा धोका असतो.
जनरल फिजीशियन डॉ. सुजाता पाठक यांनी सांगितले की, ई-कोलाय बॅक्टेरिया असलेल्या पाण्याचे सेवन केल्यास हा बॅक्टेरिया मेंदूपर्यंत पोहोचू शकतो. त्यानंतर शरिरावर विविध प्रकारचे गंभीर परिणाम होऊ शकतात. हा बॅक्टेरिया आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकतो.
प्रवासी सुविधांच्या कामांमध्येही मोठा विलंब झाल्याचे कॅगने नमूद केले आहे. २०१९-२० ते २०२३-२४ या कालावधीत तपासलेल्या ३९५ कामांपैकी ५९ टक्के कामांना विलंब झाला. तसेच प्रवासी सुविधांसाठी मंजूर झालेल्या निधीपैकी ३६ ते ४४ टक्के निधी वापरला गेला नसल्याचे आढळले. दिव्यांग प्रवाशांसाठीच्या रॅम्प, पार्किंग, टॅक्टाइल पाथवे, व्हीलचेअर आणि इतर सुविधांमध्येही कमतरता असल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे.
रेल्वेच्या सुमारे २० हजार ठिकाणी, ज्यामध्ये वॉटर कूलर्सचाही समावेश आहे, ‘टँक टू टॅप’ जलशुद्धीकरण व पाणी गुणवत्ता निरीक्षण यंत्रणा बसविण्यात येणार आहे. तसेच जुन्या टाक्या बदलणे, पाण्याच्या टाक्यांची नियोजित वेळापत्रकानुसार स्वच्छता व देखभाल करणे बंधनकारक अशा उपाययोजना करण्यात येणार आहेत. त्यांचा अहवाल वेळोवेळी प्रसिद्ध करून पारदर्शकता राखली जाणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule