पश्चिम बंगालमधील तारापीठच्या हॉटेलला आग; सहा भाविकांचा मृत्यू, अनेक जखमी
कोलकाता, 17 ऑगस्ट (हिं.स.)। पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्यातील तारापीठ मंदिरासमोर असलेल्या एका हॉटेलमध्ये सोमवारी पहाटे लागलेल्या आगीत किमान सहा भाविकांचा मृत्यू झाला असून, अन्य अनेक जण भाजले आहेत. या सर्वांना रामपूरहाट मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात
Fire at Tarapith Hotel West Bengal Six Devotees Dead Many Injured


कोलकाता, 17 ऑगस्ट (हिं.स.)। पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्यातील तारापीठ मंदिरासमोर असलेल्या एका हॉटेलमध्ये सोमवारी पहाटे लागलेल्या आगीत किमान सहा भाविकांचा मृत्यू झाला असून, अन्य अनेक जण भाजले आहेत. या सर्वांना रामपूरहाट मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींची प्रकृती पाहता मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तारापीठ पोलीस ठाण्यापासून काही अंतरावर असलेल्या पाच मजली ‘बिदेशिनी’ हॉटेलमध्ये सोमवारी पहाटे साडेचारच्या सुमारास ही दुर्घटना घडली. हॉटेलच्या वीजपुरवठा केंद्रात अचानक स्फोट झाल्यानंतर आग लागली. प्राथमिक अंदाजानुसार, विद्युत तारांमध्ये झालेल्या बिघाडामुळे हा स्फोट झाला. त्यावेळी बहुतांश भाविक झोपले होते. काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केले. सर्वत्र धुराचे लोट पसरले. अनेक जण आपल्या खोल्यांमध्ये अडकले. माहिती मिळताच तारापीठ आणि रामपूरहाट पोलीस ठाण्याचे पोलीस तसेच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी मोठ्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले.

हॉटेलचे मालक कल्याण पाल यांच्या म्हणण्यानुसार, सुरक्षा ड्युटीवर तैनात कर्मचाऱ्यांनी आग लागताच अग्निशामक यंत्राचा वापर केला आणि वीजपुरवठा बंद करण्याचा प्रयत्न केला. मात्र, हॉटेलच्या सजावटीसाठी वापरण्यात आलेल्या तंतुमय साहित्यामुळे आग वेगाने पसरली. धूर पाचव्या मजल्यापर्यंत पोहोचला. अनेक भाविक घाबरून बाहेर पडण्याचा प्रयत्न करू लागले आणि याचदरम्यान ते आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले.

हॉटेलमध्ये राहिलेले उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील बादुडिया येथील रहिवासी तपनज्योती मंडल यांनी सांगितले की, ते पत्नी, दोन मुले, आई आणि बहिणीसह तारापीठ येथे पूजा करण्यासाठी आले होते. त्यांचे कुटुंब सुमारे 45 मिनिटे हॉटेलच्या खोलीत अडकून पडले होते. खोलीला खिडकी नसल्यामुळे त्यांनी स्वच्छतागृहाच्या वरच्या भागातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तारापीठ पोलिसांनी दरवाजा तोडून त्यांना बाहेर काढले. त्यांची आई अद्याप बेशुद्ध असून, बहिणीला भाजलेल्या जखमा झाल्या आहेत.

श्रावण महिन्यात पूजा-अर्चेसाठी तारापीठ येथे आलेल्या भाविकांमध्ये या दुर्घटनेनंतर भीतीचे वातावरण आहे. पोलीस आणि प्रशासनाकडून मदत व बचावकार्य सुरू आहे. आगीचे नेमके कारण आणि हॉटेलमधील सुरक्षा व्यवस्थेचीही चौकशी केली जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande