
मुंबई, १७ ऑगस्ट (हिं.स.) : नाशिक आणि रायगड जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात गेल्या काही काळापासून रस्सीखेच सुरू होती. अखेर रायगडमध्ये शिवसेना शिंदे गटाने, तर नाशकात भाजपने बाजी मारली आहे.
महायुतीमधील तीनही पक्षांचे स्थानिक नेते आपापल्या जिल्ह्यांत आपले वर्चस्व राहावे आणि निधीचे नियंत्रण मिळावे यासाठी आक्रमक होते. यामुळे नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदाच्या नियुक्त्यांवर स्थगिती देण्यात आली होती. मात्र आज अखेर रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा प्रश्न सुटला आहे. भरत गोगावले हे रायगडचे पालकमंत्री झाले असून, नाशिकची जबाबदारी गिरीश महाजन यांच्याकडे देण्यात आली आहे.
रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वतीने आदिती तटकरे या उत्सुक होत्या, तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाच्या वतीने भरत गोगावले हे उत्सुक होते. त्यामुळे अद्यापपर्यंत रायगडच्या पालकमंत्रीपदाचा निर्णय झाला नव्हता. परंतु आता भरत गोगावले यांनी बाजी मारली असून, रायगडच्या पालकमंत्री पदी भरत गोगावले यांचं नाव जाहीर करण्यात आलं आहे.
रोजगार हमी, फलोत्पादन खार भूमीचे मंत्री भरत गोगावले हे महाराष्ट्रातील एक प्रमुख राजकारणी आणि महाड विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना (शिंदे गट) पक्षातर्फे आमदार आहेत. ते 2009 पासून सलग तीन वेळा महाडमधून निवडून आले असून राजकीय वर्तुळात आक्रमक आणि स्पष्ट वक्ता नेता म्हणून ओळखले जातात.
नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यात चुरस होती. परंतु अखेर नाशिकची धुरा गिरीश महाजन यांच्याकडे कायम ठेवण्यात आली आहे.
गिरीश महाजन हे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्रातील प्रभावशाली राजकारणी आहेत. संकटमोचक नेता म्हणून पक्षात महाजन यांची ओळख आहे. गिरीश महाजन जळगाव जिल्ह्यातील जामनेर विधानसभा मतदारसंघाचे सलग सहा वेळा आमदार आहेत. महायुती सरकारमध्ये ते कॅबिनेट मंत्री असून, नुकतीच त्यांची नाशिकच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी यापूर्वी जलसंपदा आणि वैद्यकीय शिक्षण यांसारख्या महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी सांभाळली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी