अमेरिकन सैनिकाला ठार करणाऱ्यांना इराणकडून लाखोंचे बक्षीस जाहीर; महिलांसाठी दुप्पट बक्षीस
तेहरान , 17 ऑगस्ट (हिं.स.)।अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इराणने अमेरिकन सैनिकांना लक्ष्य करण्यासंदर्भात एक मोठी आणि वादग्रस्त घोषणा केली आहे. इराणचे लष्करप्रमुख अमीर हातिमी यांच्या म्हणण्यानुसार, अमेरिकन सैनिकाला
अमेरिकन सैनिकाला ठार करणाऱ्यांना इराणकडून लाखोंचे बक्षीस जाहीर; महिलांसाठी दुप्पट बक्षीस


तेहरान , 17 ऑगस्ट (हिं.स.)।अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इराणने अमेरिकन सैनिकांना लक्ष्य करण्यासंदर्भात एक मोठी आणि वादग्रस्त घोषणा केली आहे. इराणचे लष्करप्रमुख अमीर हातिमी यांच्या म्हणण्यानुसार, अमेरिकन सैनिकाला ठार करणाऱ्या व्यक्तीला ३० हजार डॉलर म्हणजेच सुमारे २८.६ लाख रुपये बक्षीस देण्यात येईल.

हातिमी यांनी असेही म्हटले आहे की, अशी कारवाई एखाद्या इराणी महिलेने केल्यास हे बक्षीस दुप्पट करण्यात येईल. म्हणजेच महिलेसाठी ६० हजार डॉलर म्हणजेच सुमारे ५७.२ लाख रुपये बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. या घोषणेमुळे आधीच तणावपूर्ण असलेल्या अमेरिका-इराण संबंधांमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे.मात्र, ही योजना नेमकी कधी आणि कुठे लागू केली जाणार आहे, हे स्पष्ट करण्यात आलेले नाही.

इराणचे लष्करप्रमुख म्हणाले की, मोठ्या संख्येने आलेल्या विनंत्या आणि नागरिकांकडून मिळणाऱ्या पाठिंब्यानंतर ही योजना तयार करण्यात आली आहे. बक्षिसाची घोषणा करताना त्यांनी कारवाईचे ठिकाण किंवा वेळ याबाबत कोणतीही माहिती दिली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, इराणमध्ये अमेरिकन भूदलाच्या सैनिकांची मोठ्या प्रमाणावर तैनातीही नाही.

अमेरिका आणि इस्रायलने २८ फेब्रुवारी रोजी तेहरानसह इराणच्या इतर भागांवर हल्ले केले होते. या हल्ल्यांमध्ये इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या मृत्यूचाही उल्लेख करण्यात आला आहे. त्यानंतर इराणने इस्रायल तसेच आखाती देशांमध्ये असलेल्या अमेरिकन लष्करी तळांवर हल्ले केले.

इराणचे लष्करप्रमुख अमीर हातिमी यांनी अमेरिकेच्या लष्करी सामर्थ्याच्या दाव्यांवरही प्रश्न उपस्थित केला. त्यांनी अमेरिकेने मध्यपूर्वेतून माघार घ्यावी, असे म्हटले. तसेच अमेरिका पर्शियन आखात, ओमानचा आखात आणि होर्मुझ सामुद्रधुनीत प्रवेश करण्यास पात्र नाही, असा दावा त्यांनी केला.

अमेरिका आणि इराण यांच्यात १७ जून रोजी झालेल्या इस्लामाबाद करारानुसार तात्पुरता युद्धविराम आणि पुढील काळात कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी चर्चेला सहमती झाली होती. २८ फेब्रुवारीपासून सुमारे ४० दिवस चाललेल्या संघर्षानंतर हा करार झाला होता.मात्र, युद्धविराम अद्यापही नाजूक असून चर्चा पुढे सरकलेली नाही. त्याऐवजी दोन्ही देशांमध्ये अधूनमधून हल्ले सुरूच आहेत.

दिलेल्या माहितीनुसार, संघर्षाचा मुख्य केंद्रबिंदू दक्षिण इराण आणि होर्मुझ सामुद्रधुनीच्या आसपासचा भाग राहिला आहे. आतापर्यंत १७ अमेरिकन लष्करी जवानांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात असून, हे सर्व मृत्यू इराणबाहेर झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande