गाझामध्ये दररोज रात्री ३० ते ४० जणांना मारले पाहिजे, इस्रायली मंत्र्याच्या वक्तव्याने खळबळ
जेरुसलेम, 17 ऑगस्ट (हिं.स.)।ऑक्टोबर २०२३ मध्ये इस्रायलवर हमासने केलेल्या हल्ल्यानंतर इस्रायली लष्कराने हमासचे कंबरडे मोडण्याबरोबरच गाझावर जोरदार बॉम्बहल्ले करून हा परिसर उद्ध्वस्त करण्यात कोणतीही कसर सोडली नाही. आता इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत
गाझामध्ये दररोज रात्री ३० ते ४० जणांना मारले पाहिजे, इस्रायली मंत्र्याच्या वक्तव्याने खळबळ


जेरुसलेम, 17 ऑगस्ट (हिं.स.)।ऑक्टोबर २०२३ मध्ये इस्रायलवर हमासने केलेल्या हल्ल्यानंतर इस्रायली लष्कराने हमासचे कंबरडे मोडण्याबरोबरच गाझावर जोरदार बॉम्बहल्ले करून हा परिसर उद्ध्वस्त करण्यात कोणतीही कसर सोडली नाही. आता इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या आघाडी सरकारमधील एका कट्टरपंथी खासदाराने गाझामध्ये दररोज रात्री ३० ते ४० लोकांना ठार मारण्याबाबत सार्वजनिक वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे.

इस्रायलचे राष्ट्रीय सुरक्षा मंत्री इतामार बेन-ग्विर यांचे हे वक्तव्य पॅलेस्टिनी माध्यमांमध्ये वेगाने प्रसारित झाले. ७ ऑक्टोबर २०२३ रोजी हमासच्या हल्ल्यानंतर इस्रायलमधील परिस्थितीवर चर्चा करताना बेन-ग्विर यांनी गाझामध्ये पूर्वी ओलीस ठेवण्यात आलेल्या रोम ब्रास्लाव्स्की यांच्या पॉडकास्टमध्ये हे वक्तव्य केले.यावेळी बेन-ग्विर यांनी गाझामध्ये इस्रायलकडून अलीकडे करण्यात येणाऱ्या हवाई हल्ल्यांमध्ये झालेल्या कपातीवर टीका केली. ते म्हणाले, “मी पंतप्रधानांशी असहमत आहे, हे काही गुपित नाही. माझे मत आहे की गाझामध्ये लोकांना लक्ष्य करून ठार मारले पाहिजे आणि दररोज रात्री ३० ते ४० लोकांना लक्ष्य केले पाहिजे. केवळ जे तातडीचा धोका निर्माण करतात त्यांनाच लक्ष्य करू नये; तेथे काही लोक असेही आहेत, जे जगण्यास पात्र नाहीत. त्यांना जिवंत सोडता कामा नये.”

बेन-ग्विर आणि इतर इस्रायली अधिकाऱ्यांच्या अशा वक्तव्यांवर यापूर्वीही मोठ्या प्रमाणावर टीका झाली आहे. अशा अनेक वक्तव्यांना नरसंहाराच्या हेतूचा पुरावा म्हणून संयुक्त राष्ट्रांच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयासमोरही सादर करण्यात आले आहे. मात्र, इस्रायलने गाझामध्ये नरसंहार केल्याचे आरोप फेटाळून लावले आहेत.

बेन-ग्विर यांना इस्रायली लष्कराला थेट हल्ल्याचे आदेश देण्याचा अधिकार नाही. मात्र, ते इस्रायलमधील प्रभावशाली नेत्यांपैकी एक आहेत. इस्रायलमधील कारागृह व्यवस्था आणि राष्ट्रीय पोलिसांसह सुरक्षा यंत्रणेच्या महत्त्वाच्या भागांची जबाबदारी त्यांच्याकडे आहे.गाझामध्ये सुरू असलेल्या संघर्षादरम्यान इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये मोठ्या संख्येने लोकांचा मृत्यू झाला आहे. त्याचवेळी हमासविरोधातील युद्ध थांबवण्यासाठी युद्धविरामाच्या प्रयत्नांनाही वेग आला आहे.

अमेरिकेचे वाटाघाटीकार आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे जावई जेरेड कुशनर यांनी गाझामध्ये युद्धविराम घडवून आणण्यासाठी सुरू असलेल्या नव्या राजनैतिक प्रयत्नांचा भाग म्हणून रविवारी हमासचे प्रमुख नेते खलील अल-हय्या यांची भेट घेतली. कुशनर हे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचीही भेट घेणार आहेत.

या चर्चांचा उद्देश अमेरिकेच्या पाठिंब्याने तयार करण्यात आलेल्या १५ कलमी योजनेला पुढे नेणे हा आहे. या योजनेनुसार हमासने गाझामध्ये शस्त्रे सोडावीत आणि इस्रायलने युद्धामुळे उद्ध्वस्त झालेल्या पॅलेस्टिनी प्रदेशातून आपले सैन्य मागे घ्यावे, अशी तरतूद आहे.

कुशनर आणि हमासचे नेते खलील अल-हय्या यांच्यात झालेल्या या दुर्मीळ भेटीला एका प्रादेशिक अधिकाऱ्याने आणि हमासच्या एका अधिकाऱ्याने दुजोरा दिला. पत्रकारांशी बोलण्याची परवानगी नसल्याने त्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर ही माहिती दिली. कुशनर यांच्याशिवाय इजिप्त, कतार आणि तुर्कियेच्या अधिकाऱ्यांनीही अल-हय्या यांच्यासोबतच्या बैठकीत सहभाग घेतला.

दरम्यान, दक्षिण लेबनॉनमध्ये इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यानंतर इस्रायल आणि हिजबुल्लाह यांच्यातील तणाव पुन्हा वाढला आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी आरोप केला की, हिजबुल्लाहने युद्धविरामाचे उल्लंघन करून इस्रायली सैनिकांवर हल्ला केला. या हल्ल्यात तीन सैनिक गंभीर जखमी झाले. त्यानंतर प्रत्युत्तर म्हणून इस्रायली लष्कराने हिजबुल्लाहच्या एका ठिकाणावर हल्ला केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande